तेलंगणा पोलिसांची कस्टडी : नाशिकच्या सराफाचा शासकिय इमारतीवरून कोसळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:28 PM2020-02-25T22:28:42+5:302020-02-25T22:32:39+5:30
नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या ...
नाशिक :तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आले. दरम्यान, या पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीतील संशयित सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी (४५) यांना चौकशीसाठी सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.२५)पथकाच्या ताब्यात असताना बिरारी यांचा शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला. यामुळे शहरात खळबळ उडाली. सायबराबाद पोलिसांच्या या कारवाईबाबत कुठल्याहीप्रकारची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोव-यात सापडली आहे. मयत बिरारी यांच्या नातेवाइकांनी सायबराबाद पोलिसांच्या तपासी पथकावर घातपाताचा आरोप जाहीररीत्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी बोलताना केला.
सायबराबाद आयुक्तालय हद्दीत लुटलेल्या मुद्देमालाच्या चौकशीसाठी गुन्हे शोध पथकाचे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली सुमारे आठ ते दहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक आरोपी प्रकाश उर्फ नाग्या शिंदे (रा. निलगिरीबाग, औरंगाबादरोड) यास घेऊन दोन दिवसांपासून शहरात मुक्कामी आले आहेत. या गुन्ह्यात पथकाने संशयावरून चौकशीसाठी (बेस्ड कस्टडी) बिरारी व त्यांच्या दुकानातील एका कारागिराला ताब्यात घेतले होते. घरफोड्यांमध्ये लुटलेले दागिने सराफाला विक्री केल्याची कबुली प्रकाशने तपासी पथकाला दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावरून त्या पथकाने बिरारी यांना अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना अचानकपणे बिरारी हे विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून कोसळून ठार झाल्याची घटना घडली. सायबराबाद पोलिसांच्या ताब्यातून निसटून बिरारी यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. याप्रकरणाचा सविस्तर तपास सीआयडीकडून केला जाणार असल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.