जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होणार टेलिमेडिसीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:36 AM2018-10-03T01:36:13+5:302018-10-03T01:37:12+5:30
नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने ऐनवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि औषधांचा सल्ला घेणे सोपे ठरत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सुमारे चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटरनेट जोडणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आठ केंद्रांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले असून, विशेष म्हणजे त्यातील सिन्नर तालुक्यातील एका केंद्रात टेलिमेडिसीनचा शुभारंभही करण्यात आला आहे.
संजय पाठक ।

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आधार आहे. खासगी डॉक्टरांची अपुरी अवस्था असल्याने प्राथमिक केंद्रावर अवलंबून राहावे लागते. मात्र अशाप्रकारे रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती हा विषय वादाचा असतो. अनेकदा डॉक्टर गायब असतात किंवा उपलब्ध असलेले डॉक्टर एखाद्या विकाराबाबत तज्ज्ञ नसतात अशावेळी टेलिमेडिसीनसारख्या साधनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी उत्तम इंटरनेट कनेक्टीव्हीटी आवश्यक असल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बीएसएनएलमार्फत आॅप्टिकल फायबरने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे चाळीस केंद्रांच्या जोडणीचे काम करण्यात येणार असून, त्यापैकी आठ केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील केंद्रात तर टेलिमेडिसीन योजनेचा शुभारंभ अलीकडेच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
तंत्रज्ञान पूरक लाभ
प्राथमिक आरोग्य केंद्रातील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ टेलिमेडिसीन नव्हे तर व्हिडीओ कॉन्फरसिंग, प्रशासकीय नियंत्रण यासह अन्य अनेक प्रकारचे लाभ घेता येऊ शकतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम होण्यास तंत्रज्ञान पूरक ठरणार आहे.