टेलिफोन एक्स्चेंजच्या विद्युत जनित्राला आग
By admin | Published: April 8, 2017 12:58 AM2017-04-08T00:58:03+5:302017-04-08T00:58:13+5:30
पंचवटी : पेठरोडवरील एसटी कार्यशाळेशेजारी असलेल्या भारत संचार दूरनिगम (टेलिफोन) एक्स्चेंजच्या विद्युत जनित्र रूमला आग लागून डिझेल टॅँक, रेडिएटर, मशिनरी व वायर्स जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
पंचवटी : पेठरोडवरील एसटी कार्यशाळेशेजारी असलेल्या भारत संचार दूरनिगम (टेलिफोन) एक्स्चेंजच्या विद्युत जनित्र रूमला आग लागून डिझेल टॅँक, रेडिएटर, मशिनरी व वायर्स जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र विद्युत रोहित्र खोलीतील यंत्रसामग्री जळाल्याने अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत माहिती अशी की, पेठरोडवरील एसटी कार्यशाळेशेजारी बीएसएनएलचे टेलिफोन एक्स्चेंज असून, दुपारी पाऊण वाजेच्या सुमाराला विद्युत जनित्र खोलीतून धूर निघू लागला. सदरची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पंचवटी अग्निशमन दलाला माहिती कळविली. या खोलीत डिझेल टॅँक तसेच रेडिएटर, वायर्स व अन्य यंत्रसामग्री असल्याने या वस्तूंनी तत्काळ पेट घेतला. पंचवटी अग्निशमन दलाचे विभागप्रमुख जगदीश अहिरे, के. बी. हिंगमिरे, एन. के. सोनवणे, व्ही. आर. झिटे, व्ही. के. पाटील, व्ही. आर. गायकवाड, उमेश गोडसे, एन. ए. सोनवणे, संदीप जाधव, जे. आर. झनकर आदि कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या एका बंबाच्या साह्याने ही आग विझविली. (वार्ताहर)