तापमान १२.७ अंशावर; कडाक्याच्या थंडीपासून तुर्तास दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 04:26 PM2020-01-20T16:26:57+5:302020-01-20T16:41:38+5:30
मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला. थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले.
नाशिक : मकरसंक्रांतीनंतर अचानकपणे पारा कमालीचा घसरल्याने मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत होता; मात्र रविवारी शहराच्या किमान तापमानात ५ अंशांनी वाढ झाली. सोमवारी १२.७ अंशापर्यंत पारा वर सरकल्याने थंडीच्या कडाक्यापासून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला तर कमाल तापमानातही तीन अंशांनी घट झाली. यामुळे थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले. चालू हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाली. शनिवारी अंशत: वाढ होऊन पारा ७.८ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे थंडीचा कडाका वातावरणात कायम होता. निफाडमध्ये सर्वाधिक २.८ अंशापर्यंत पारा घसरल्याने दवबिंदूचा बर्फ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनिवारपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारठा कमी होण्यास मदत झाली. किमान तापमानाचा पारा थेट ११अंशांपर्यंत वर सरकला आणि कमाल तापमान २७ अंशांपर्यंत पोहचले.
एकूणच मागील चार दिवसांत नाशिककरांना अक्षरक्ष: थंडीचा कहर अनुभवयास आला; मात्र रविवारी थंडीची तीव्रता कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे नाशिककरांनी रविवारची सुटी संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर घालविली. शहरातील बाजारपेठांसह कॉलेजरोड, गंगापूररोड या भागात खवय्यांची गर्दी पहावयास मिळाली. तसेच खरेदीसाठीदेखील नाशिककर कुटुंबासह बाहेर पडले. एकूणच थंडीचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम रविवारी संध्याकाळनंतर शहराच्या रस्त्यांवर पहावयास मिळाला.
चार दिवसांपासून पहाटेच्या सुमारास जोरदार थंडी पडत असल्यामुळे सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र होते; मात्र रविवारी शहरातील जॉगिंग ट्रॅक काहीसे गजबजलेले दिसून आले. मात्र जॉगर्स नियमितपणे घराबाहेर पडले, ते संपूर्णता उबदार कपड्यांनी ‘पॅकअप’ करूनच. सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी मात्र या चार दिवसांमध्ये वाढल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले.
शहराचे किमान तापमान असे...
सोमवारी (दि.१३) १५.५
मंगळवारी (दि.१४) १५.०
बुधवारी (दि.१५) १३.४
गुरुवारी (दि.१६) ९.८
शुक्रवारी (दि.१७) ६.०
शनिवारी (दि.१८) ७.८
रविवारी (दि.१९) ११