तपमानाचा पारा चाळिशीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:13+5:302021-03-30T04:10:13+5:30
कोरोनाने केला रंगपंचमीचा बेरंग सिन्नर : दरवर्षी होळी झाल्यानंतर रंगपंचमी हा सण उत्साहात साजरा होतो, मात्र यंदा कोरोनाचा धोका ...
कोरोनाने केला रंगपंचमीचा बेरंग
सिन्नर : दरवर्षी होळी झाल्यानंतर रंगपंचमी हा सण उत्साहात साजरा होतो, मात्र यंदा कोरोनाचा धोका वाढल्याने रंगपंचमीचा रंग उडाला आहे. काही दिवसाआधीच बाजारात रंगाची दुकाने थाटली होती. लहान मुलांचा कल पिचकारी खरेदीकडे असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करता येणार नाही.
शहर, तालुक्यात होलिकोत्सव
सिन्नर : कोरोनाच्या सावटाखाली शहर व तालुक्यात होलिकोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. होळीसाठी जमा होणारा जनसमुदाय यंदा कोरोनामुळे दिसला नाही. ग्रामीण भागात मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत होलिकादहन करण्यात आले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी कोरोना महामारीपासून सर्व नागरिकांचे रक्षण करण्याची प्रार्थना केली.
डुबेरे रस्त्यावर घरफोडी
सिन्नर : डुबेरे मार्गावरील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाली. घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ६४ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. बालचंद्र शंकर राऊत यांनी याबाबत तक्रार दिली. दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, पाच ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे कानातले असे ६४ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कांद्याचा उत्पादन खर्च निघेना
सिन्नर : बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून लाल व उन्हाळ असे दोन्ही प्रकारचे कांदे दाखल झाले आहेत. तसेच कांदा दरातही मोठी घसरण झाली आहे. हवामानातील बदल आणि त्यामुळे होणाऱ्या करपा रोगामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातही सध्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
दहीवडी रस्ता खुला करण्याची मागणी
वावी : सिन्नर तालुक्यातील दहीवाडी ते कानळद रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रस्ता खुला करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने तहसीलदारांना साकडे घातले आहे.