नाशिक शहरातील तपमानाचा पारा चाळीस अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:41 AM2018-05-29T00:41:30+5:302018-05-29T00:41:30+5:30
शहरातील तपमानाचा पारा पुन्हा चाळीस अंशांवर स्थिरावला असून, सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिसत असले तरी अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे.
नाशिक : शहरातील तपमानाचा पारा पुन्हा चाळीस अंशांवर स्थिरावला असून, सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिसत असले तरी अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. दुपारी उन्हाच्या झळांसोबत जाणवणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. शनिवारी ४०.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी (दि. १६) कमाल ३९.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाल्याने तपमानाचा पारा चाळिशीत स्थिरावल्याचे दिसत असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातीले उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकचे तपमान नेहमीच कमी नोंदवले जात असल्याने सामान्यत: तपमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे तपमान सरकले तरी नाशिककरांना उन्हाचा त्रास जाणवू लागतो. त्यात यावर्षी मे महिन्यात सातत्याने तपमानाचा पारा ४०अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्याने नाशिककरांना यावर्षी उष्णतेचा चांगलाच चटका सोसायला लागला असून, अजूनही उष्ण तपमानासोबतच उकाडाही वाढला असल्याने शीतपेयांसह, थंड फळांना मागणी वाढली आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसून येत आहे. अनेकजण दुपारच्या वेळी अति महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही विरळ झाल्याचे दिसत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्येही दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. घरातून बाहेर पडताना तोंडाला कपडा बांधून व अंगभर कपडे घालून बाहर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.