आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले
By Admin | Published: October 8, 2014 01:10 AM2014-10-08T01:10:16+5:302014-10-08T01:13:07+5:30
आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले
संगमेश्वर : आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले असताना विजेच्या भारनियमनामुळे ग्रामीण जनतेसोबत शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. भारनियमनामुळे शेतपिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होऊन कांदा, डाळिंबाला त्याचा फटका बसत आहे.गेल्या आठ-दहा दिवसांपासून मालेगाव परिसरात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. तपमानाचा आकडा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे शहर-तालुक्यातील जनता हैराण झाले आहेत. महिला वर्गाकडून उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, गॉगलचा वापर केला जात आहे. विद्यार्थी-कष्टकरी वर्गास टोपी-हातरूमालचा आधार घ्यावा लागत आहे. उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढून उकाडा जाणवत असल्यामुळे पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. त्याशिवाय घरे, दुकान, कार्यालयात कामकाज करणे अशक्य झाले आहे. त्यातच विजेच्या भारनियमनाने नागरिकांच्या त्रासात भरच पडली आहे. थंडपेयांना पुन्हा मागणी वाढली आहे. पावसाळ्यानंतर हीट आणि वातावरणातील बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढीव उष्णतेमुळे कांदा-डाळिंबाच्या पिकाला त्याचा तडाखा बसला आहे. आधीच कांदा, डाळिंबाचे भाव पडल्याने शेतकरीवर्ग आॅक्टोबर हीट-विजेचे भारनियमन व परिणामी पाणीटंचाई यामुळे परिस्थितीशी झुंज देत आहे. (वार्ताहर)