पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर तपमानाचा पारा पुन्हा चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:57 AM2018-06-05T00:57:54+5:302018-06-05T00:57:54+5:30
शहराचे तपमान पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळी शहरात रोहिणीचा वर्षाव झाला होता. रविवारपासून पुन्हा वातावरणातील दमटपणा वाढला असून, रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सोमवारी काही प्रमाणात नाशिककरांना ऊन जाणवले व कमाल तपमानाचा पारा ३७.२ अंशापर्यंत पोहचला.
नाशिक : शहराचे तपमान पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळी शहरात रोहिणीचा वर्षाव झाला होता. रविवारपासून पुन्हा वातावरणातील दमटपणा वाढला असून, रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सोमवारी काही प्रमाणात नाशिककरांना ऊन जाणवले व कमाल तपमानाचा पारा ३७.२ अंशापर्यंत पोहचला. शहराचे कमाल तपमान शनिवारी ३८ अंशावर होते. दिवसभर ढगाळ हवामान व दमटपणा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही वाढले होते. संध्याकाळपर्यंत हवेत ७२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता वाढली होती. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या काही सरींचा नाशिक करांवर वर्षाव झाला. ०.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद शनिवारी पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. जूनचे चार दिवस उलटले असून, पहिल्या दिवशीही कमाल तपमान ३८ अंश इतके होते. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ७ जूनपर्यंत ६१.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला होता. ३ जून रोजी संध्याकाळी नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले होते. २४ तासांत ४८.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद गेल्या वर्षी जूनच्या चौथ्या दिवशी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा जूनचा चौथा दिवस (दि. ४) कोरडाठाक गेला. एकूणच मागील वर्षी रोहिणीची दमदार हजेरी नाशिककरांनी अनुभवली होती. यावर्षी रोहिणी नक्षत्रामध्ये निराशा पदरी पडण्याची शक्यता वातावरणाच्या स्थितीवरून वर्तविली जात आहे. मृग नक्षत्राला येत्या शुक्रवारपासून (दि. ८) प्रारंभ होत असून, या नक्षत्रात पावसाची दमदार हजेरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.