नाशिककर गारठले! हुडहुडी वाढली, तापमान १३.६ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:54 PM2021-12-19T12:54:49+5:302021-12-19T12:56:01+5:30
नाशिक : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या अवकाळीनंतर ...
नाशिक : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या अवकाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. आठवडाभरात शहरातील कमाल तापमानात जवळपास २ अंशांची घट झाली असून, शनिवारी (दि. १८) किमान तापमान १३.६ तर कमाल तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
हिमाचल प्रदेशच्या लाहुल-स्पिती या भागात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील तापमानाचा पारा शून्यावर पोहोचला आहे. त्याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या तापमानात देखील घट झाली आहे. या लाटेमुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधील तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
शनिवारपासून पाऱ्यात घसरण होण्यास सुरुवात झाली. हा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रातील घडामोडींमुळे नाशिकसह राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी बसरला होता. त्यानंतर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली होती. त्यामुळे हिवाळा असूनही थंडीची अनुभूती येत नव्हती. परंतु दोन-तीन दिवसांपासून तापमानात पुन्हा हळूहळू घसरण होऊ लागली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (दि. १३) १५.८ अंश असलेल्या किमान तापमानात सलग घसरण नोंदविली गेली आहे. शनिवारी त्यात आणखी घट होऊन सोमवारच्या तुलनेत तापमान २ अंशांची खाली आल्याने शेकोट्या पेटल्या आहेत. पुढील पाच दिवस हवामान काेरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऱ्यात अशीच घसरण झाल्यास शहरात यंदाच्या हंगामातील नीच्चांकी तापमानाची नोंद होऊ शकते.
-------------
आठवडाभरातील तापमान
वार -------- किमान----कमाल
सोमवार ----१५.८-------२८.३
मंगळवार ---१४.५-------२८.५
बुधवार ------१५.८-------२८.५
गुरुवार ------१४.५------२९.०
शुक्रवार -----१३.८------२८.३
शनिवार -----१३.६------२८.२