‘ताप’दायक ठरतोय उन्हाळा : तपमानाचा पारा सातत्याने चढता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:31 AM2018-04-29T00:31:04+5:302018-04-29T00:31:04+5:30
राज्यात उष्णतेची लाट वाढली असून, कमाल तपमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने नाशिककरांना यंदाचा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. एप्रिलमध्ये तीनवेळा पारा चाळिशीपार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२७) हंगामातील उच्चांकी ४०.५ इतके कमाल तपमान नोंदविले गेले.
नाशिक : राज्यात उष्णतेची लाट वाढली असून, कमाल तपमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने नाशिककरांना यंदाचा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. एप्रिलमध्ये तीनवेळा पारा चाळिशीपार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२७) हंगामातील उच्चांकी ४०.५ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तपमान अधिक असल्यामुळे नाशिककर सध्या प्रचंड ‘हॉट एप्रिल’चा अनुभव घेत आहे. आठवडाभरापासून तपमान ३७ ते ४० अंशांच्या जवळपास राहत असल्याने प्रखर ऊन जाणवत आहे. शुक्रवारी पारा थेट ४०.५ अंशांपर्यंत गेल्याने नाशिककर घामाघुम झाले होते. एप्रिलचे दोन दिवस शिल्लक राहिले असून, मे महिना उजाडणार आहे. यामुळे तपमानाचा पारा असाच चढता राहिल्यास मे मध्ये उन्हाचा अधिक तडाखा नागरिकांना बसू शकतो.
गेल्या वर्षाचा अखेरचा आठवडा दिलासादायक
गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळाला होता. कारण चाळिशीवर पोहचलेले कमाल तपमान अखेरच्या आठवड्यात ३६ ते ३८ अंशांच्या जवळपास होते. २० एप्रिल २०१७ रोजी कमाल तपमान ३८.४ अंश तर ३० एप्रिल २०१७ रोजी ३६.७ अंश इतके नोंदविले गेले होते. तसेच यावर्षी २७ तारखेला ४०.५ अंश तर गेल्या वर्षी याच तारखेला ३८.१ अंश इतक्या तपमानाची नोंद झाली होती. एप्रिलचे अजून दोन दिवस शिल्लक असून, तपमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उष्णतेचा दाह; खबरदारी आवश्यक
शहराचे कमाल तपमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले आहे. शुक्रवारी नाशिककर अक्षरक्ष: भट्टीत भाजून निघाले. कारण मालेगाव ४४ तर नाशिक शहरात ४०.५ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले. या वाढत्या तपमानामुळे उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्यतो नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडणे टाळावे. पाणी अधिकाधिक पिण्यावर भर द्यावा, मात्र फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे. फळे किंवा शीतपेयांवर थंड पाणी पिऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. उन्हात जाण्याची गरज भासल्यास खबरदारी घ्यावी. उघड्या डोक्याने उन्हात फिरणे टाळावे. सनस्कीन क्रीम, हॅट, टोपी, स्कार्फ, हॅन्डग्लोज, दर्जेदार सनग्लासच्या वापरावर भर द्यावा.