कलेचे मंदिर कलेलाच मारक ठरायला नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:59 AM2018-09-05T00:59:41+5:302018-09-05T01:00:12+5:30
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे.
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे.
कालिदासची दरवाढ झाल्याने आजवर जोपासले जाणारे कलेचे वातावरण क्षणात नाहीसे होऊन तेथे व्यावसायिकता वाढीस लागणार आहे. याचा फटका नाट्यकर्मींना तर बसेलच पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे कालिदासची भाडेवाढ मागे घ्यावी, अशा भावना कलाकार, दिग्दर्शक आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.कालिदासची भाडेवाढ एवढी करायला नको. येथे आधी जेवढे प्रयोग व्हायचे, प्रायोगिक नाटकांसाठी ज्या सवलती दिल्या जायच्या त्यामुळे नाट्यकलेचे संवर्धन होत होते. ते आता होणार नाही. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घेतलीच पाहिजे.
- गणेश सरकाटे, नाट्य व दूरचित्रवाणी अभिनेतामहाकवी कालिदास कलामंदिरचे वाढवलेले भाडे फारच जास्त आहे. मी पुणे, मुंबई येथेही नाट्यप्रयोग करतो. पण तिथलेही दर इतके जास्त दिसत नाहीत. कालिदासला वाढ करायचीच होती तर टप्प्याटप्प्याने करायची होती. एकदम करायला नको होती. मी एका स्पर्धेसाठी नुकताच नंदुरबारला गेलो होतो. तेथील नाट्यगृहात सकाळ सत्रासाठी ११ हजार रुपये भाडे वाढविण्यात आले. आता त्या नाट्यगृहात नाटक वगैरे होतच नाही. फक्त शोकसभा, संमेलने वगैरेसारखे कार्यक्रम होतात. ही गत कालिदासची व्हायला नको.- विक्रम गवांदे, दिग्दर्शककालिदासचे वाढलेले भाडे कुणालाच परवडणारे नाही. यातून स्थानिक कलाकार, हौशी रंगकर्मी यांना तर काही संधीच राहणार नाही. हौशी नाट्यकर्मींना एवढे पैसे देऊन नाटक करणे शक्य नसते. त्यातून कलेला वावच रहाणार नाही. ही भाडेवाढ मागे घेतली गेली पाहिजे.
- अपूर्वा कुबल, कलाकार, लोकहितवादी संघकालिदास कलामंदिरची भाडेवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात का, कुणी केली, कुणाशी चर्चा करून केली हेच समजत नाही. शहरात तीन चांगल्या नाट्यगृहांची गरज असताना आणि आता नूतनीकरण झाले असताना अचानक एवढी भाडेवाढ करणे अयोग्य आहे. यामुळे शहरातल्या सांस्कृतिक वातावरणाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. नाशिककरांना अशी स्मार्ट सिटी मिळणार असेल तर ती नको आहे. महापालिकेने सांस्कृतिक गरज म्हणून कालिदासकडून आर्थिक फायद्याची अपेक्षा ठेवली नाही तर काय हरकत आहे?
- सचिन शिंदे, अभिनेता, दिग्दर्शकनाट्यगृहाचे भाडे किती असावे ते ठरवण्याचे, ते योग्य पद्धतीने आकारण्याचे काम त्या त्या ठिकाणचे सत्ताधारी, प्रशासनाधिकारी करत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून बघावा. पण हौशी रंगकर्मींच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही निवेदन देऊन, पाठपुरावा करू. हौशी रंगकर्मींना किती दिवस मोफत नाट्यगृह देणार? काय काय सुविधा देणार हे बघितले जाईल. शासनाच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांच्याबरोबर बोलून, त्यांना पटवून देऊन आपण आपला प्रामाणिक हेतू साध्य करून घेऊ शकतो, असे मला वाटते.
- नूपुर सावजी, नाट्य व सिने कलाकार