वडाळानाका परिसरात बंगल्याच्या आवारात टेम्पोला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:55 PM2020-05-06T17:55:48+5:302020-05-06T18:00:54+5:30
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वडाळानाका येथील मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात अगदी बंगल्यांच्या भींतीला लागून उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने (एम.एच.१५ एसक्यू ९२४४) अचानकपणे पेट घेतला.
नाशिक : वडाळानाका परिसरातील एका बंगल्यात उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने अचानकपणे बुधवारी (दि. ६) संध्याकाळी पेट घेतला. यामुळे बंगल्याच्या आवारात असलेले लाकडी फर्निचरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह तत्काळ दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. अवघ्या अर्ध्या तासात जवानांनी आग आटोक्यात आणली.
याबाबत अधिक माहिती अशी, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वडाळानाका येथील मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात अगदी बंगल्यांच्या भींतीला लागून उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने (एम.एच.१५ एसक्यू ९२४४) अचानकपणे पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच टेम्पो पुढील बाजूने आगीच्या संपुर्णपणे भक्ष्यस्थानी पडला. यामुळे बोळीत असलेले लाकडी फर्निचरही पेटण्यास सुरूवात झाली. आगीच्या ज्वाला व काळाकुट्ट धूर आकाशात उठू लागल्याने बंगला मालकाने तत्काळ शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात संपर्क साधून मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी लिडिंग फायरमन इकबाल शेख, फायरमन तौसीफ शेख, घनश्याम इंफाळ, उदय शिर्के, अनिल गांगुर्डे हे एक बंबाच्या सहाय्याने अवघ्या दोन मिनिटांत दाखल झाले. बंबचालक देविदास इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. संध्याकाळी पावणे पाच वाजता आग लागली. अवघ्या अर्ध्या तासात आग विझविण्यास जवानांना यश आले.