सत्पाळकर यांना तात्पुरता जामीन
By admin | Published: March 2, 2016 11:31 PM2016-03-02T23:31:06+5:302016-03-02T23:32:23+5:30
अनामत जमा करण्याचे आदेश : राज्याबाहेर जाण्यास बंदी
नाशिक : मैत्रेयच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. २) वीस दिवसांसाठी तात्पुरता सशर्त अंतरीम जामीन मंजूर केला. चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सत्पाळकरांचे पारपत्र जप्त करण्याचे आदेश देत महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.
सत्पाळकर यांना फेब्रुवारी महिन्यात गुरुवारी (दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी बुधवारी न्यायालयापुढे हजर के ले. सत्पाळकरांनी वकिलांमार्फत जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एम.एच. मोरे यांच्या न्यायालयात केला होता. या अर्जावर न्यायालयात सरकारी वकील अॅड. राजेंद्र घुमरे, अॅड.पंकज चंद्रकोर व सत्पाळकरांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. सत्पाळकर यांनी राज्य सोडून जाऊ नये, तसेच त्यांचे पारपत्र पोलिसांनी जप्त करावे आणि एक कोटी ४७ लाख रुपयांची अनामत रक्कम दोन टप्प्यांत जमा करावी, असे आदेश देत न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मैत्रेय गु्रपमधील गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीमार्फत देण्यात आलेले धनादेश बँकेत न वटता परत आल्याने काही तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर (रा़ पालघर) यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, सत्पाळकरांचा भाऊ व कंपनीचा दुसरा संचालक परुळेकर अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.