शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार तात्पुरता काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 01:27 AM2019-12-21T01:27:34+5:302019-12-21T01:28:43+5:30
शाळा दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होऊनही सदर विषयाची फाइल तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी अडवून ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. सभापतींसह सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोरच जमिनीवर ठिय्या मारल्याने अखेर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा तात्पुरता पदभार काढून घेण्याबरोबरच विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावी लागली.
नाशिक : शाळा दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होऊनही सदर विषयाची फाइल तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी अडवून ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. सभापतींसह सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोरच जमिनीवर ठिय्या मारल्याने अखेर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा तात्पुरता पदभार काढून घेण्याबरोबरच विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावी लागली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा होत असताना महेंद्रकुमार काले यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांचे वर्तन व फाइलींच्या प्रवासाच्या विषयाला वाचा फोडली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे एका कामानिमित्त व्यक्ती पाठविली असता, त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून कामे करून घेतो काय असे सांगून संबंधित व्यक्तीचा अवमान केल्याची तक्रार केली. काले यांनी एकामागोमाग तकारींचा पाढा वाचायला सुरुवात केल्यावर उपाध्यक्ष नयना गावित, उदय जाधव, संजय बनकर आदींनी अधिकाºयाचे नाव सांगा, अशी मागणी केली. त्यावर स्वत: नितीन बच्छाव यांनी उभे राहून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी शिक्षण सभापती यतिन पगार यांनी आपल्याला अशाच प्रकारे गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाचा अनुभव येत असल्याचे सांगून, आपल्या फाइली बाजूला ठेवून दिल्या जात असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या फाइलींवर स्वाक्षरी करीत नसल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेचे कामे सुरू करण्यासाठी ‘टोकन ग्रॅण्ड’ची पद्धत अवलंबिली जात असल्याच्या कारणामुळे सर्व कामे ठप्प झाल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून आपण शाळा दुरुस्तीसाठी निधी आणूनदेखील अद्यापही शाळांची दुरुस्ती केली जात नाही, अशी तक्रार केली. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्याला आठ वर्षे झाली असून, असा कारभार आजवर पाहिला नाही, सभापती असल्यामुळे अडीच वर्षे मनातील दु:ख सांगू शकलो नाही, परंतु यापुढे नवीन पदाधिकाºयांना प्रशासनाच्या वाईट कामाचा अनुभव येऊ नये म्हणून आपण आज सभागृहात आपली भावना व्यक्त करीत असल्याचे पगार म्हणाले, तर उदय जाधव यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी काही विशिष्ट फाइलींवरच स्वाक्षºया करीत असल्याचा आरोप केला. सदस्यांच्या भावना पाहून अध्यक्ष सांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना खुलासा करण्यास सांगितले असता, त्यांनी फाइलींचा प्रवास का लांबला याची चौकशी करून शिक्षणाधिकाºयांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले. परंतु त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानाचे अभियंत्यांकडे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी दिले, परंतु त्यांनी उशिरा अंदाजपत्रक दिल्यामुळे फाइलीला उशीर झाल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र ते ऐकून घेण्याच्या कोणीही मन:स्थितीत नव्हते.