नोटांच्या कमतरतेवर तात्पुरता इलाज
By Admin | Published: April 18, 2017 01:55 AM2017-04-18T01:55:44+5:302017-04-18T01:56:03+5:30
नोटांच्या कमतरतेवर तात्पुरता इलाज
नाशिक : शहर व जिल्ह्यातील बॅँकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नोटांची कमतरता भासत असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी जेमतेम ६५ कोटी रुपये देण्याची तयारी रिझर्व्ह बॅँकेने दर्शविली असली तरी, जिल्ह्यातील चलनवळनाची परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅँकेने रोगावर तात्पुरता इलाज चालविला असून, एटीएममधील खडखडाट कायम राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून चलनी नोटांची कमतरता भासत असून, स्टेट बॅँक आॅफ इंडियाने रिझर्व्ह बॅँकेकडे साडेतीनशे कोटी रुपयांची मागणी नोंदवून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र आज, उद्या असे करत पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने सोमवारी स्टेट बॅँक तसेच खासगी बॅँकांची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्याची व्यक्त केली जाणारी शक्यता फोल ठरली. शहरी व ग्रामीण भागासाठी स्टेट बॅँकेला जवळपास दररोज दहा कोटीहून अधिक रकमेची मागणी असते, अशीच मागणी अन्य राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बॅँकांनाही असते. परंतु गेल्या आठवड्यापासून स्टेट बॅँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांचे जवळपास ७० टक्के एटीएम पैशांअभावी बंद पडल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. स्टेट बॅँकेचा रिझर्व्ह बॅँकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, रिझर्व्ह बॅँकेने कल्याणच्या चेस्ट बॅँकेतून ६५ कोटी रुपये जिल्ह्यासाठी देण्याची तयारी दर्शविली
आहे. यातील ४० टक्के रक्कम शहरी व २० टक्के ग्रामीण भागासाठी वापरण्यात येणार असली तरी, दररोजचे आर्थिक व्यवहार पाहता आणखी चार दिवसांनी हीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामानाने खासगी बॅँकांकडे ७० ते ८० कोटी रुपये शिल्लक असल्याने तात्पुरता दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी म्हणून बॅँकेतून तीनपेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास बॅँकांच्या अधिभाराच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने नागरिकांनी बॅँकेतून अधिकचे पैसे काढण्यावर भर दिल्याचे बॅँकांचे म्हणणे आहे (प्रतिनिधी)एटीएम बंदच राहणार?रिझर्व्ह बॅँकेकडून सध्या मिळणाऱ्या नोटांवरच शहर व जिल्ह्यातील एटीएमचे भवितव्य अवलंबून आहे. बॅँकेकडून दोन हजार, पाचशे व शंभराच्या किती प्रमाणात मिळतात ते पाहूनच एटीएममध्ये नोटांचा भरणा केला जाणार आहे. त्यामुळे कदाचित अपेक्षित नोटा न मिळाल्यास एटीएममध्ये भरणा केला जाणार नाही.