पाथरे गावात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:02+5:302021-05-03T04:10:02+5:30
जनता कर्फ्यूसंदर्भात पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. यावेळी कोरोनासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
जनता कर्फ्यूसंदर्भात पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. यावेळी कोरोनासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पाथरे परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार आणि प्रादुर्भाव लक्षात घेता ३ मे ते १२ मेपर्यंत पूर्णपणे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरच्या काळात दवाखाने, मेडिकल या अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. कृषी सेवा केंद्र ७ ते ११ वाजेपर्यंत असणार आहेत. फेरीवाले, बाहेरील व्यापारी यांना या काळात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. दूध संकलनासाठी सकाळी सहा ते आठ व सायंकाळी सहा ते आठ हा कालावधी ठेवण्यात आला आहे. ज्या व्यक्ती आजारी असतील त्यांनी आरोग्य विभागाच्या नियमानुसार होम क्वारंटाइन राहावे, तसेच संबंधित कुटुंबांनीही काळजी घ्यावी. ज्या व्यक्ती आजारातून बऱ्या झाल्या आहेत अशांनी उगाचच फिरू नये. विनामास्क प्रत्येक व्यक्तीला दंड करून कार्यवाही करण्यात येणार आहे. विनाकारण चौकात, सार्वजनिक ठिकाण गर्दी करू नये, तसेच . स्वतःची, कुटुंबाची, आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. या काळात घरीच राहावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. वावी पोलीस स्टेशनला पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतने यासंदर्भात निवेदन दिले. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर, तसेच या काळात व्यावसायिक, दारू दुकाने यावर लक्ष देण्याचे आणि कार्यवाही करण्याचे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस स्टेशनला करण्यात आले आहे.
दारूबंदीसाठी तीनही ग्रामपंचायतींच्या वतीने ठराव करण्यात आला असून, हा ठराव तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. वावी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलीस कर्मचारी या काळात देखरेख ठेवणार आहेत. या बैठकीसाठी पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य विभाग यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.