दहा दिवसांनंतर जिल्ह्याला मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:20+5:302021-08-14T04:19:20+5:30
नाशिक : गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या ...
नाशिक : गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे वाटप केले जाणार आहे. कोविशिल्डचे ८८ हजार तर कोव्हॅक्सिन ७ हजार ४०० डोसेस प्राप्त झाले आहेत.
केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसींचे डोस प्राप्त होत नसल्याने डोससाठी वाट बघावी लागत असल्याने, त्याचा परिणाम लसीकरणावरही होत आहे. जिल्ह्यातील साठा दोन दिवसांपूर्वीच संपल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणही ठप्प झाले होते. त्यामुळे अधिक लसींची आवश्यकता असतांनाच जिल्ह्यासाठी तब्बल ९५ हजार इतके लसींचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लसीकरणाला गती मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्याला आजवर प्राप्त झालेल्या लसींच्या आधारे २० लाखांच्या पुढे लसीकरण करण्यात आलेले आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. कोरोनाची लाट रोखून धरण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे त्या दृष्टीने लसीकरण वाढविले जात आहे. त्यासाठी सातत्याने केंद्राकडे मागणी नोंदविली जात आहे. जिल्ह्याने आतापर्यंत २० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. त्यात १४ लाख ८९ हजार ४४१ नागरिकांनी पहिला लसीचा डोस घेतला आहे, तर ५ लाख १९ हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. एका दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण हा जिल्ह्याचा विक्रम आहे. हा विक्रम मागे टाकण्यासाठीचे नियोजनही केले जात आहे.
नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीत १८२ केंद्रे असून, त्यामध्ये सरकारी आणि सेवाभावी संस्थांची केंद्रे आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३८५ तर मालेगाव मनपा हद्दीत २४ लकीकरण केंद्रांवर लसपुरवठा केला जात आहे. लसीकरणाला गती मिळावी, यासाठी २६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रशासनाने परवानगी दिली असून, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केले जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनसोबत रशियाची व्ही.स्पुतनिक ही लसही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तूर्तास स्पुतनिक ही लस चार खासगी रुग्णालयांतून दिली जात आहे.