दहा दिवस ती राहिली आपल्या बहिणीच्या मृतदेहासोबत धक्कादायक घटना : देवळाली कॅम्प येथील घटनेने सारेच थक्क; मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप खुलासा नाही; दोन्ही बहिणी मनोरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:47 AM2019-11-01T01:47:20+5:302019-11-01T01:47:35+5:30
देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला.
देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला.
देवळाली कॅम्प विजयनगर परिसरात पंचमोती सोसायटीत राहणाऱ्या कविता दिगंबर बागुल (४४) या महिलेचा दहा दिवसांपूर्वी मृत्यू झालेला असताना तिची मोठी बहीण मीना दिगंबर बागुल ही गेल्या दहा दिवसांपासून प्रेताजवळच बसून होती. शेजारील नागरिकांनी बागुल यांचे नातेवाईक रवींद्र रमेश खरोटे यांना माहिती दिली. ते स्वत: घटनास्थळी आले असता त्यांना कविता बागुल या मयत अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत होते तर मीना बागुल या फक्त सुन्न नजरेने मृतदेहाकडे पाहत होत्या. या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याने एकत्रच याठिकाणी राहात होत्या.
सदर घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना कळवली असता सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती बघून त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, कविता बागुल यांचे नातेवाईकही तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी रात्री उशिरा जागेवरच पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिवाळीपूर्वी या मुलींची मावशी आणि काका त्यांची भेट घेऊन गेले होते.
दिगंबर बागुल हे मुंबई येथे एमटीएनएलच्या सेवेत होते. अठरा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर देवळाली कॅम्प येथे पत्नी कांताबाई बागुल, मुली मीना व कविता यांच्यासह राहात होते. तीन वर्षांपूर्वी दिगंबर बागुल व कांता बागुल यांचे निधन झाल्याने दोन्ही मुलींवर मानसिक आघात झाला. त्यातून त्या मनोरु ग्ण झाल्या. दोघी बहिणींपैकी मीना बागुल यांचा विवाह घोटी येथे झालेला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याही मनावर परिणाम होऊन लहान बहीण कविता बागुल सोबत त्या राहू लागल्या होत्या. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी नातेवाईक मामा, आत्या, काका, मावशी हेच बघत होते.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर प्रचंड मानसिक धक्का बसल्यामुळे दोघी बहिणी मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्या आणि त्यातूनच त्या मनोरुग्ण झाल्याने काही वर्ष त्या एकत्रित, परंतु एकाकी जीवन जगत होत्या. अभावानेच त्यांच्याकडे नातेवाइकांचे येणे होते. दिवाळीपूर्वी या मुलींची मावशी, काका त्यांना भेटून गेले होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघड झाली. कविताचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबत काहीही माहिती नाही.