दहा-पंधरा जागांची ‘एनएसयूआय’ची मागणी
By admin | Published: January 22, 2017 11:22 PM2017-01-22T23:22:12+5:302017-01-22T23:22:32+5:30
महापालिका निवडणूक : एनएसयूआय बैठक; पदाधिकाऱ्यांचे आश्वासन
नाशिक : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होवो अथवा न होवो नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाचे (एनएसयूआय) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण ताकद पक्षाने दिलेल्या उमेदवारापाठीमागे उभी करावी़ काँग्रेसमुळे मोठे झालेले व पक्ष सोडून गेलेल्या ज्येष्ठांमुळे युवा वर्गाला एक प्रकारे संधी निर्माण झाली आहे़ एनएसयूआय व युवक काँग्रेसने महापालिकेसाठी मागणी केलेल्या पंधरा जागांबाबत पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरण्यात येईल, असे आश्वासन रविवारी शहराध्यक्ष शरद अहेर यांनी दिले़
काँग्रेस कमिटीत रविवारी (दि़२२) पार पडलेल्या एनएसयूआय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अहेर बोलत होते़ युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने त्यांच्याकडे सर्वच पक्षांतील नेत्यांचे इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ त्यास काँग्रेस पक्षातील काही नेते वा कार्यकर्तेही अपवाद नाहीत़ यामुळे पक्षाचे नुकसान झाले असले तरी युवकांची दुसरी फळी तयार असून, त्यांना यानिमित्ताने संधी प्राप्त झाली आहे़
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेल्या या मेळाव्यात नाशिक जिल्हाध्यक्ष नितीन काकड यांनी पक्षाने एनएसयूआय व युथ काँग्रेसमिळून किमान पंधरा जागांवर उमेदवारी देऊन युवा नेतृत्वास संधी देण्याची मागणी केली़ तसेच पक्षाच्या अडचणीच्या काळात एनएसयूआय व युथ काँग्रेससोबत राहणार असल्याची ग्वाही दिली़ यावेळी एनएसयूआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष नितीन काकड, उपाध्यक्ष राहुल कदम, कुशल लुथरा, सचिन भुजबळ, सुनील आव्हाड, चित्रा लोखंडे, माजी उपमहापौर गुलाम शेख, सेवादलाचे वसंत ठाकूर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)