सटाणा नगरपरिषदेची दहा तास आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:53 PM2019-09-11T12:53:36+5:302019-09-11T12:53:57+5:30
सटाणा:येथील पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक तब्बल दहा तास सलग चाललेल्या आढावा बैठकीत नगराध्यक्ष मोरे यांनी पंधरा विभागप्रमुखांकडून कामकाजाचा आढावा घेतला.
सटाणा:येथील पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक तब्बल दहा तास सलग चाललेल्या आढावा बैठकीत नगराध्यक्ष मोरे यांनी पंधरा विभागप्रमुखांकडून कामकाजाचा आढावा घेतला.
नगराध्यक्ष मोरे यांनी समिती सभागृहात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देत बैठकीबाबत पूर्वकल्पना दिली. बैठकीत संबंधित विभागाचे प्रलंबित कामकाज,सध्या सुरू असलेले कामकाज,कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, सुधारणा करण्यासाठीच्या आवश्यक बाबी तसेच आगामी काळातील कामासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याने संबंधित विभागप्रमुखांनी विभागाची टिप्पणी सोबत ठेवण्याबाबतही कळविण्यात आले होते. यादिवशी कुठल्याही प्रकारची रजा मंजूर न करण्यासोबतच अनुपस्थित राहिल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी(दि.९) सकाळी साडेनऊ वाजता नगराध्यक्ष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी डगळे यांच्या उपस्थितीत पालिका कामकाजाचा आढावा घेण्यास सुरूवात करण्यात आली.या आढावा बैठकीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक माणिक वानखेडे,कैलास चव्हाण,शालिमार कोर,निलेश बोरसे,ज्ञानेश्वर खैरणार आदींसह विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.