वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहा किलोमीटरचा फेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:04 PM2020-05-29T23:04:16+5:302020-05-30T00:08:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांना तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत आहे.
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांना तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत आहे.
येवला शहरात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहे. शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने रुग्ण येवला ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी येत असतात. आता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास काढावा लागतो व त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याने येवलेकरांना या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येवला ते सावरगाव असा दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी येवलेकर प्रारंभी येवला ग्रामीण रुग्णालयात जातात, तेथून त्यांना सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास सांगितले जाते. येवला ते सावरगाव साधारणत: दहा किलोमीटर अंतर असून, गरजूंना हा फेरा वाढतो याबरोबरच आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्ययही होतो. काही मंडळी तर ७ वाजेपासूनच सावरगाव आरोग्यकेंद्रापुढे जावून थांबतात. मग, साडेनऊ वाजता वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी पुन्हा पायपीट होते, या सगळ्यात कधी कधी आरोग्यकेंद्राच्या कामकाजाची वेळही निघून जाते.
शहरात अनेक खासगी रुग्णालये आहेत. मात्र या खासगी रुग्णालयांमधून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अव्वाच्या सव्वा फी आकारणी केली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, येवलेकरांसाठी येवला ग्रामीण रुग्णालयातूनच वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
येवलेकरांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी सावरगाव येथे जावे लागते. सावरगाव हे येवल्यापासून दहा किलोमीटर आहे, जाऊन येऊन वीस किलोमीटरचा फेरा होतो. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या झेरॉक्स काढायच्या म्हटल्या तर सावरगाव येथे एकच दुकान असून, ते मनमानी पैसे घेतात व पायपीट होते ती वेगळी. येवल्यातील लोकांसाठी येवला ग्रामीण रुग्णालयातच वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे सोयीचे आहे. लोकांची गैरसोय व पैसे, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वरिष्ठांनीच या प्रकरणी लक्ष घालावे.
- प्रवीण भावसार, येवला