दहा लाखांचा मुद्देमाल जप्त : संत्री विक्रीचा बहाणा अन् गुदामावरच मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 06:06 PM2020-11-22T18:06:51+5:302020-11-22T18:09:32+5:30
टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले.
नाशिक : शहरात संत्री विक्रीचा बहाणा करत दाखल झालेल्या चोरट्यांनी परतीच्या प्रवासात सिन्नरमधील एक बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालाचे गुदाम लूटीच्या प्रकरणाचा छडा लावण्यास ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांच्या मुसक्या बांधत त्यांच्याकडून सुमारे १० लाख ५२ हजार ९९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, औरंगाबाद येथून नाशिकला आलेले संशयित अजिम बाहशहा शेख (४६, रा. टाकळी, ता. खुलताबाद), वाजिद रफिक चौधरी (२५, रा. वाळुंजगाव, औरंगाबाद) या दोघांनी सिन्नरमधे दोन दिवस मुक्काम ठोकतएका चारचाकी वाहनांना बॅटरी पुरविणारे दुकान व गुदामाची रेकी केली आणि मागील आठवड्यात मध्यरात्री सिन्नर शहरातील उद्योगभगवन व संगमनेरनाका परिसरातील अविनाश कॉर्बो लिमिटेड कंपनीचे गुदाम व न्यु इंडिया अॅटो इलेक्ट्रिक अॅड बॅटरीचे बंद दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. वाहनांचे इलेक्ट्रीक सुटे भाग, लोखंडी मोटर, विद्युत पंप, इलेक्ट्रीक मोटर, ग्राइंडर व्हील, वाहनांच्या बॅटऱ्या, वेल्डींग वायरीचे बंडल असा १० लाख ५२ हजार ९९७ रुपयांचा माल चोरी करुन आयशर ट्रकमधून पोबारा केला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सचीन पाटील यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. यानुसार पथकाने चक्रे फिरविली. सहायक पोलीस निरिक्षक अनील वाघ, पोलीस नाईक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, निलेश कातकाडे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे सापळा रचून टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून घरफोड्यांचे विविध जिल्ह्यांतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
आंतरजिल्ह्यात टोळी सक्रीय
संशयित अजीम, वाजीद यांची आंतरजिल्ह्यात टोळी सक्रीय आहे. त्यांच्यावर आतापर्यंत औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांत घरफोडी, चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अन्य काही फरार साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक (एम.एच.२० सीटी २६२१) पोलिसांनी जप्त केला आहे.
-