दहा सदस्यांची पुन्हा ‘एंट्री’
By admin | Published: February 24, 2017 12:58 AM2017-02-24T00:58:08+5:302017-02-24T00:58:25+5:30
जिल्हा परिषद : सभापती उषा बच्छाव मात्र पराभूत
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमधून विद्यमान ११ जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी दहा सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत निवडून देण्याची किमया मतदारांनी केली आहे. विद्यमान सभापती उषा बच्छाव यांना मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.
इतकेच नव्हे तर काही विद्यमान सदस्यांचे नातलग निवडून आले, तर काहींच्या नातलगांना पराभवाचे धनी व्हावे लागले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती किरण थोरे व उषा बच्छाव अनुक्रमे विंचूर व वीरगाव गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यात उषा बच्छाव यांना भाजपाच्या साधना गवळी यांनी पराभूत केले. तर किरण थोरे यांनी शिवसेनेच्या वेदिका होळकर यांना पराभूत करीत तिसऱ्यांदा निवडून येत हॅट््ट्रिक केली. कळवण तालुक्यातून नितीन पवार कनाशी, माजी अध्यक्ष जयश्री पवार खर्डेदिघर व डॉ. भारती पवार मानूर गटातून निवडून आल्या आहेत. पवार कुटुंबीयांतील तीनही जिल्हा परिषद दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. एकलहरे गटातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेल्या सुशीला मेंगाळ यावेळी शिरसाटे गटातून शिवसेनेकडून निवडून आल्या. पालखेड गटातून मागील वेळी निवडून आलेल्या माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर या दुसऱ्यांदा पालखेड गटातून निवडून आल्या आहेत. पेठ तालुक्यातील कोहोर व धोंडमाळ गटातून सासरे भास्कर गावित व स्नुषा हेमलता गावित शिवसेनेकडून निवडून आले आहेत. जायखेडा गटातून राष्ट्रवादीचे यतिन पगार पुन्हा एकदा निवडून आले आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत सायखेडा गटातून भाजपाकडून निवडून आलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती चव्हाण या सुरगाणा तालुक्यातील हट्टी गटातून भाजपाकडूनच दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. (प्रतिनिधी)
लालदिवा सिन्नर की येवल्याला
सर्वाधिक जागा निवडून आलेल्या सिन्नर तालुक्यातून शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे किंवा छगन भुजबळांच्या गडाला शह देणाऱ्या येवला तालुक्यातील राजापूर गटातून जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा दराडे किंवा नगरसूल गटातून निवडून आलेल्या माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा सविता पवार यांना अध्यक्षपदाची संधी आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला असल्याने या पदावर आरक्षित गटातून निवडून आलेल्या महिलेला संधी मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे.