आरोग्य क्षेत्रातील दहा हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:34+5:302020-12-22T04:14:34+5:30
महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि. २१) लसीकरणासंदर्भात टास्क फोर्सची बैठक घेतली. यात त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला. कोरोना ...
महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि. २१) लसीकरणासंदर्भात टास्क फोर्सची बैठक घेतली. यात त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला.
कोरोना प्रतिबंधक लस कधी उपलब्ध होणार, याविषयी माहिती नसली तरी प्रशासकीय पातळीवर तयारी मात्र सुरू झाली आहे. नाशिक शहरात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. नाशिक शहरात खासगी आणि महापालिका रुग्णालये मिळून दहा हजार कर्मचारी असून, अजूनही खासगी रुग्णालयांकडून कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यासंदर्भात खासगी रुग्णालयांना स्मरण करून देण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या १७ दवाखाने आणि चार मोठी रुग्णालये याठिकाणी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाची माहिती असणाऱ्या ३७८ कर्मचारी आहेत. त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येेणार असून, सुमारे शंभर कर्मचाऱ्यांना रोज लसीकरण केले जाईल, अशी व्यवस्था असणार आहे. शासनाच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असले तरी त्यांच्यानंतर आता अन्य फ्रंटवर काम करणारे मनपा कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासनाने मागवलेली माहिती महापालिकेने पाठवली आहे.
इन्फो..
डॉक्टरांनीच मनातील भीती दूर करण्यासाठी आयएमएला साकडे
लसीकरणाची प्रतीक्षा लवकरच संपत असताना आता अनेकांमध्ये लसीच्या दुष्परिणामांची भीती देखील व्यक्त केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर आधी डॉक्टरांनीच लसीकरण करून सर्वसामान्य नागरिकांची भीती घालवली पाहिजे. त्यासाठी आयएमएशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांनाच आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितली.
इन्फो..
लसीकरणासाठी जागांचा शोध
महापालिकेच्या वतीने सुरुवातीला केवळ रुग्णालयातच लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी एन्ट्री आणि एक्झीट अशा दोन सुविधा असलेली शासकीय कार्यालये किंवा तत्सम संस्थांची देखील यादी तयार करून तेथे लसीकरणाची सेाय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मनपाच्या ३७८ कर्मचाऱ्यांप्रमाणेच लस देऊ शकतील; अन्य खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील यादी तयार करण्यात येेणार आहे.