सानप यांच्या संस्थेने भरली दहा लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:02 AM2018-09-08T01:02:36+5:302018-09-08T01:02:54+5:30
पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे.
नाशिक : पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे.
गेल्या महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाने अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याच वेळी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या या संस्थेला महापालिकेने नोटीस बजावल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. अविश्वास ठराव आणल्यानेच सानप यांना नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली होती.
विद्याभवनमध्ये सानप यांच्या संस्थेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर अभ्यासिका आणि वाचनालय चालविले जात असून, त्यात विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक जात असतात. परंतु २०१२ पासून या अभ्यासिका आणि वाचनालयाकडे थकबाकी होती.
महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आल्यानंतर सानप यांनी ही सामाजिक संस्था असून, व्यावसायिक नव्हे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याचधर्तीवर सानप यांनी कॉँग्रेसची सत्ता असताना शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन वाचनालयाचा बहुमान केला होता. अशा संस्थांना व्यावसायिक दर लागू करणे हे परवडणारे नसल्याचे मत व्यक्त केले आहे.