दहा हजार सानुग्रह अनुदान मंजूर
By admin | Published: October 20, 2016 01:36 AM2016-10-20T01:36:45+5:302016-10-20T01:41:22+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी आनंदात : वेतनही होणार दिवाळीपूर्वी
नाशिक : जिल्हा परिषदेत कार्यरत दहा हजारांहून अधिक शिक्षक तसेच तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार सानुग्रह अनुदान जिल्हा परिषदेच्या वतीने मंजूर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच दिवाळीपूर्वीच आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आॅक्टोबरचे वेतन देण्याची तयारी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वी जिल्हा परिषदेच्या तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पाच ते दहा हजारापर्यंत सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करण्यात येते. तसेच दिवाळीच्या खरेदीसाठी महिन्याआधीच वेतनही दिले जाते.
यंदाच्या दिवाळीत मात्र शासन स्तरावरून वेतनाबाबत
काहीही मार्गदर्शन न आल्याने
जिल्हा परिषद प्रशासन संभ्रमात असतानाच या महिन्याच्या २८ ते २९ तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन काढण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने केली आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी दिवाळीत दहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पाच समान हप्त्यात सानुग्रह अनुदानाची ही दहा हजाराची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नंतर कपात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)