दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली एमबीए सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:46 AM2019-03-11T01:46:23+5:302019-03-11T01:47:26+5:30
महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा ही कॅप राउंडसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही सीईटी परीक्षा ९ व १० मार्च रोजी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
नाशिक : महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा ही कॅप राउंडसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही सीईटी परीक्षा ९ व १० मार्च रोजी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील आयटी पार्कमध्ये सलग दोन दिवस चार सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली असून, जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी एमबीए प्रवेशासाठी ही परीक्षा दिली आहे.
महासीईटीतर्फे घेण्यात आलेल्या या सीईटी परीक्षेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर होणार असून, या सीईटीच्या माध्यमातून नाशिकमधील सुमारे २४ महाविद्यालयांमधील जवळपास १७६० जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. एमबीए सीईटीसाठी सुमारे राज्यभरातून १ लाख १० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ३१ मार्चला परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना ९ व १० मार्चला सीईटी परीक्षा देता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी १५ मे रोजी अॅटमाची सीईटी होणार असून अॅटमा सीईटी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एमबीए प्रवेशाची संधी मिळणार आहे.