इगतपुरीच्या पूर्व भागात विजेच्या लपंडावाने दहा-बारा गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:29+5:302021-07-29T04:14:29+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी, खेड, ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी, खेड, पिंपळगाव मोर, वासाळी, खडकेद, मांजरगाव, टाकेद खुर्द, बारशिंगवे, मायदरा, सोनोशी, अधरवड, धानोशी आदी गावांसह एकूण चाळीस वाड्यांमध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे दहा ते बारा गावे अंधारात आहेत. तातडीने या गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी इगतपुरी-बोरटेंबे येथील वीज वितरण केंद्राचे अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.
इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, तसेच वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युततारा तुटल्यामुळे परिसरातील बेलगाव तऱ्हाळे, टाकेद बुद्रुक, टाकेद खुर्द, धामणगाव, धामणी, पिंपळगाव मोर, धानोशी, मायदरा, वासाळी, खेड, अडसरे आदी गावांसह जवळपास छोट्या-मोठ्या ४० वाड्यांमध्ये आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ती गावे अंधारात असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गावात होणारा मुख्य पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तसेच पावसामुळे ग्रामस्थांना दैनंदिन पाणीपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळे बंद झाले. इगतपुरी-बोरटेंबे-घोटी वीज वितरणचे कर्मचारी गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्रंदिवस या कामात व्यस्त असून काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे वीज वितरणचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले.
----------------------
महिलांचा पाणीटंचाईशी सामना
परिसरासाठी पाणीपुरवठा करण्यास मुख्य विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वीजच उपलब्ध नसल्यामुळे येथील महिलांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता जरी अवकाळी पावसामुळे वीजतारा, विजेचे खांब पडले असले तरी इगतपुरी-बोरटेंबे उपकेंद्राचा नेहमीच खेळखंडोबा सुरूच असल्याचे नागरिकांनी यावेळी सागितले. उपकेंद्रासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करून नेहमीच बिघाड होत असलेल्या ठिकाणी नवीन उपकरणे, रोहित्र, तसेच जीर्ण झालेले विजेचे खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.
-----------------
दरवर्षी पावसाळ्यात विजेच्या अडचणींचा सामना करावा लागतो. वीज वितरणने पावसाळ्यापूर्वी मुख्य रोहित्रांचे काम केल्यास अडचणी येणार नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी. (२८ नांदूरशिंगोटे ४)
280721\28nsk_5_28072021_13.jpg
२८ नांदुरशिंगोटे ४