दहा वर्षांपासून ‘त्यांना’ प्रतीक्षा कायम होण्याची
By admin | Published: June 14, 2014 11:10 PM2014-06-14T23:10:36+5:302014-06-15T00:28:16+5:30
हंगामी कर्मचारी : महाबॅँक नवनिर्माण सेना आंदोलनाच्या पावित्र्यात
नाशिक : जिल्ह्यातील महाराष्ट्र बॅँकेच्या विविध शाखांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले हंगामी कर्मचारी अद्यापही कायम होण्याच्या प्रतीक्षेत असून, याबाबत महाबॅँक व्यवस्थापनाने तातडीने निर्णय न घेतल्यास महाबॅँक नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष उमाकांत कोटणीस यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र बॅँकेच्या एकूण ८९ शाखांपैकी ५४ शाखांमध्ये सफाई कामगार या पदावर हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जुना आग्रा रोडवरील कालिका मंदिर सभागृहात सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महापौर अॅड. यतिन वाघ होते.
यावेळी कोटणीस म्हणाले, महाराष्ट्र बॅँक ही सार्वजनिक बॅँक असून, बॅँकेत कर्मचाऱ्यांना वेतन करार हा व्दिपक्षीय करारानुसार दिला जातो. परंतु महाराष्ट्र बॅँकेत अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर बॅँकेने हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. बॅँकेच्या विविध शाखांमध्ये ५० ते ५५ हंगामी कर्मचारी कार्यरत असून, त्यांना केवळ १०० ते २०० रुपये दररोज पगार दिला जातो. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अशा तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी सेवा बजावत आहेत. यामध्ये काही महिलांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांना वेठबिगाऱ्याप्रमाणे वागणूक मिळत असून, बॅँकेने या कर्मचाऱ्यांना कायम करावे व त्यांच्या पगारात वाढ करावी, यासाठी संघटना पाठपुरावा करत असून, व्यवस्थापनाकडून आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नसल्याने यापुढील काळात संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कोटणीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
महापौर अॅड. यतिन वाघ यांनीही संघटनेने घेतलेल्या पावित्र्यास पाठिंबा दर्शविला असून, लवकरच बॅँकेच्या महाप्रबंधकांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राज्य संघटन सचिव दिनेश खाडे, नाशिक संघटन सचिव सुरेश रहाटळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)