विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 PM2021-05-29T16:19:50+5:302021-05-30T00:06:01+5:30

ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकामाच्या विरुद्ध पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. दंडात्मक कारवाई करून हे खोदकाम रोखण्याचा निर्णय झाला. महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. जणूकाही याच कर्मचाऱ्यांमुळे हे खोदकाम सुरू होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सभोवताली घडणाऱ्या या बाबींची अजिबात कल्पना नव्हती, असे भासविण्याचा प्रयत्न आहे.

The tendency for destruction must be stopped for development | विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी

विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी

Next
ठळक मुद्देगेल्यावर्षी अंजनेरी परिसराच्या अशाच प्रश्नाविषयी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाआरोग्य यंत्रणेपुढे आव्हानकेवळ घोषणा नको

मिलिंद कुलकर्णी             

पर्यावरणप्रेमींच्या सजग आणि सतर्क भूमिकेचे समाजाने स्वागतच करायला हवे. जागरूक पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे. ज्या शासकीय विभागांवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे, ते विभाग नेमके करतात काय, हा सामान्यांना न उलगडणारा प्रश्न आहे. सरकार बदलले की पर्यावरणाचे धोरण बदलते, हा अनुभव आहे.
गेल्यावर्षी अंजनेरी परिसराच्या अशाच प्रश्नाविषयी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला होता. कारवाईचे नाटक तेव्हादेखील झाले होते; पण कालांतराने सगळे पूर्वपदावर आले. विकासासाठी विनाश ही संकल्पना जागतिक पातळीवरच रूढ करण्याचा आणि त्याचे जाणीवपूर्वक समर्थन करण्याचा संघटित प्रयत्न भांडवलदार करीत असतात. त्याला शासकीय, राजकीय आणि प्रशासकीय अशा तिन्ही पातळ्यांवर मूक पाठिंबा असतो. एवढ्या बलाढ्य यंत्रणेशी लढणे मूठभर पर्यावरणप्रेमींना अवघड असते. ब्रह्मगिरीच्या रूपाने मिळालेले यश कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारे आहे. म्हणून त्याचे महत्त्व आहे.

आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक जिल्हा अग्रस्थानी होता. संपूर्ण देशात नाशिकच्या रुग्णसंख्येविषयी चर्चा होती. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांनी दुसरी लाट थोपविण्यात यश आले आहे, मात्र अजूनही ११,००० रुग्ण उपचार घेत आहेत. मृत्यूंची संख्या रोज ३० पेक्षा अधिक आहे. रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय राज्य शासनाने रहित केला आहे. त्याच्या मागील उद्देश निश्चितच चांगला आहे; परंतु सार्वजनिक रुग्णालयातील आरोग्य सेवा तसेच अन्य सेवा यांचा दर्जा वाढविण्याची आवश्यकता आहे. कोरोनापश्चात आजारांनी तोंड वर काढले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने साथरोगांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे.

केवळ घोषणा नको
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रशासन व समाज गाफील असताना गाठले. प्रगत देशांमध्ये दुसरी आणि तिसरी लाट सुरू असताना आम्ही मात्र पहिली लाट यशस्वीपणे रोखली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होतो. दुसऱ्या लाटेने पितळ उघडे पडले. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा निर्धार हवेत विरला होता. पीएम केअर फंडातील काही व्हेंटिलेटर्स कार्यान्वित झाले नव्हते. ऑक्सिजन प्रकल्पाची धाव केवळ निविदा प्रक्रियेपर्यंत होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. तेव्हा आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा पुरती हतबल दिसून आली. आता रुग्णसंख्या कमी होत असताना सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना रुग्णवाहिका ताब्यात मिळाल्या आहेत; परंतु त्या पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याचे चित्र आहे. आता ४० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा झाली आहे. जून महिना अखेरपर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित होतील असा निर्धार व्यक्त झाला आहे. तो वास्तवात उतरला तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होईल. संभाव्य तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करता येईल.
 

Web Title: The tendency for destruction must be stopped for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.