स्मार्ट पार्किंगच्या निविदेची होणार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:08 AM2020-12-28T04:08:40+5:302020-12-28T04:08:40+5:30
शहरात वाहनतळाची सोय करण्यासाठी २८ ठिकाणी ऑन स्ट्रीट तर पाच ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय ...
शहरात वाहनतळाची सोय करण्यासाठी २८ ठिकाणी ऑन स्ट्रीट तर पाच ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम खासगीकरणातून हाेणार असून, पार्किंगच्या जागा महापालिकेच्या असल्याने जमा होणाऱ्या रकमेपैकी १७ लाख रुपये नाशिक महापालिकेस देय असणार आहेत. गेल्या वर्षी हा ठेका देण्यात आला होता; मात्र चुकीच्या जागा निवडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर राजकीय पक्षांनी आंदाेलनाची तयारी केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय कंपनीने बाजूला ठेवला. त्यानंतर मार्च- एप्रिलमध्ये हा ठेका मार्गी लागणार, असे वाटत असताना मार्चमध्ये केारोनामुळे सर्व कामच ठप्प झाले. त्यानंतर ठेकेदार कंपनीने एकंदर अंदाज आणि सर्व्हे केल्यानंतर हा ठेका परवडणार नसल्याचे संबंधित ठेकेदाराचे म्हणणे आहे. दर महिन्याला संबंधित ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य सर्व बाबींचा एकूण खर्च चाळीस ते पन्नास लाख रुपये येणार असून, महापालिकेला १७ लाख रुपये देय रक्कम आहे; मात्र हे परडवणारे नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेला देय रक्कम कमी करण्याची ठेकेदाराची मागणी असून, हा प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळासमोर मांडण्यात आल्याने त्यावरून आक्षेप घेण्यात आला. ठेकेदाराने जर खुल्या पद्धतीने निविदा भरल्या असतील तर त्याला परिणामांची पुरेशी कल्पना असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा प्रकारची सुट देणे शक्य नसल्याचे कंपनीच्या काही संचालकांचे म्हणणे आहे.
इन्फो...
स्मार्ट पार्किंगच्या ठेेकेदाराच्या मागणीसंदर्भात निविदेत काही तुट आहे काय आणि केवळ कोरोना कालावधीत काही सवलत देता येईल काय, यासंदर्भात चाचपणी करण्याची
सूचना कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी लोकमतशी बेालताना
सांगितले.