लवकर उपलब्ध होणार असल्यास लसींसाठी निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:31+5:302021-05-19T04:15:31+5:30
नाशिक : शहरासाठी अपुऱ्या प्रमाणात कोराेना प्रतिबंधक लसींचे डाेस उपलब्ध होत असल्याने महापालिकेच्या वतीने आता थेट लस खरेदी करून ...
नाशिक : शहरासाठी अपुऱ्या प्रमाणात कोराेना प्रतिबंधक लसींचे डाेस उपलब्ध होत असल्याने महापालिकेच्या वतीने आता थेट लस खरेदी करून १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांना लसीकरण करण्याची तयारी सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या आत तातडीने लस उपलब्ध होत असेल तर निविदा काढण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांनी बोलविलेल्या सर्व पक्षीय बैठकीत मंगळवारी (दि.१८) घेण्यात आला. आयुक्त दालनाशेजारील सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अन्य पर्यायांचादेखील विचार करण्यात आला असून मुंबई आणि पुणे महापालिकेने निविदा मागविल्या असल्याने त्यांच्याकडूनही लस उपलब्ध होऊ शकेल काय याची शक्यता पडताळण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
नाशिक शहरात मार्च ते एप्रिल दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या शिखरावर पोहोचली होती. वास्तविक १६ जानेवारीपासून टप्प्प्याने लसीकरण करण्यात येत आहे. १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असले तरी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण होत आहे. सर्वाधिक बाहेर पडणारा हा वर्ग असून, त्यांंचे लसीकरण न झाल्यास तिसऱ्या लाटेत अधिक भयावह स्थिती हेाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेनेच लस खरेदी करून नागरिकांना लसीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते जगदीश पाटील, विलास शिंदे, शाहू खैरे, गजानन शेलार, नंदिनी बोडके, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.
इन्फो..
१ शहराच्या लोकसंख्येचा विचार करता १८ ते ४५ या वयोगटांतील सुमारे पाच लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. सध्या शासनाकडून लस उपलब्धता अल्पप्रमाणात होत असून, या वयोगटातील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लस खरेदी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
२ शासनाकडून ऑगस्ट महिन्यापासून लस उपलब्ध होईल असा साधारणत: अंदाज असून, तत्पूर्वी महापालिकेस लस उपलब्ध होत असल्यास ती खरेदी करणे योग्य ठरू शकते. तसेच ती लस खरेदी करताना स्वतंत्र ग्लोबल टेंडर काढावे किंवा त्याऐवजी मुंबई, पुणे, ठाणे या महापालिकांनी जे ग्लोबल टेंडर काढले आहे, त्यांच्याकडे नमूद होणाऱ्या दरांचा आढावा घेऊन त्यांच्याकडून या लस प्राप्त करून घेण्याबाबत पडताळणी करावी.
३ या महापालिकांनी ठरवलेले लसींचे दर व लस किती दिवसांत उपलब्ध होईल याची सविस्तर माहिती घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. यासंदर्भातील अधिकार आयुक्तांना देण्यात आले. प्रशासनाने यासंदर्भातील सर्व माहिती लोकप्रतिनिधींना सादर करावी, असे यावेळी सांगण्यात आले. नाशिक शहरासाठी किती लस खरेदी करावी याबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
इन्फो..
घरोघरी जाऊन लसीकरण करणार
या बैठकीत सध्या सुरू असलेले लसीकरण, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धता यावर चर्चा करण्यात आली. परंतु त्याचबरोबर घरोघरी जाऊन लसीकरणाची व्यवस्था करणे करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. मनपास लवकरात लवकर लस उपलब्ध झाल्यास खासगी कंपन्या, दवाखाने यांना लस उपलब्ध करून देण्यात येाणार असून, त्यामुळे लसीकरण केंद्रावर होत असणारी गर्दी टाळता येणे शक्य, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------
छायाचित्र आर फोटेावर १८ एनएमसी--- नाशिक महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी करण्यासाठी आयोजित बैठकीप्रसंगी आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी, गणेश गिते आणि सतीश सोनवणे आदी.
===Photopath===
180521\18nsk_47_18052021_13.jpg
===Caption===
नाशिक महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी करण्यासाठी आयोजित बैठकीप्रसंगी आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी, गणेश गिते आणि सतीश सोनवणे आदी.