नाशिकमध्ये बंद आंदोलनास गालबोट; दाेन गटात वाद झाल्याने तणावाचं वातावरण
By संकेत शुक्ला | Published: August 16, 2024 04:32 PM2024-08-16T16:32:24+5:302024-08-16T16:33:00+5:30
दोन गटात वाद झाला होता. मात्र आता पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.
नाशिक : बांगलादेशात राजकीय अराजकता माजल्यानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शुक्रवारी (दि.१६) नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र काही लोकांनी बंदला विरोध दर्शवित दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन गटात वाद झाले.
दाेन गट समोरासमोर आल्याने भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला.
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली. पण पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला. त्यामुळे भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला.
पोलिसांनी तातडीने भद्रकालीत येणारी वाहने बॅरेकेड्स लाऊन अडविली. मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रविवार कारंजा येथे जमाव रस्त्यावर आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस कुमक तेथे पोहोचली. युवकांना पांगविण्यात आले. शहरात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.