अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:24 IST2025-02-22T16:23:45+5:302025-02-22T16:24:22+5:30
पोलिसांनी आमदार फरांदे यांच्यासह कार्यकर्त्यांना अर्ध्या वाटेतच अडवल्यानंतर फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बैठक दिली.

अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर
Nashik Police: नाशिक महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर शहरात आज काहीसा तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. काठेगल्ली परिसरात कारवाईसाठी महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलीसही दाखल झाल्यानंतर एक गट रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी काठेगल्ली परिसराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी आमदार फरांदे यांच्यासह कार्यकर्त्यांना अर्ध्या वाटेतच अडवल्यानंतर फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बैठक दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली.
अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर शहरात दोन गट रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी विविध पावले उचलली. काठे गल्ली परिसरात आलेले महंत सुधीरदास यांना ताब्यात घेण्यात आलं, तर महंत अनिकेत शास्त्री यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. तसंच आमदार देवयानी फरांदे यांना काठेगल्ली सिग्नलवर अडवण्यात आले. काठे गल्ली येथील संत सावता माळी चौकात आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात जमावाकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी दुपारी ४ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळ हटवावे, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा आमदार फरांदे यांच्याकडून देण्यात आला होता.