रेल्वेस्थानकावरील व्यावसायिक वादातून मनमाड शहरात पुन्हा तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:39 AM2018-09-29T01:39:25+5:302018-09-29T01:39:55+5:30
रेल्वेस्थानकावरील व्यावसायिक वादातून शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे शुक्रवारी शहरात पुन्हा पडसाद उमटले.
मनमाड : रेल्वेस्थानकावरील व्यावसायिक वादातून शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे शुक्रवारी शहरात पुन्हा पडसाद उमटले. संतप्त जमावाच्या एक गटाने हल्लेखोरांनी शस्त्र लपवून ठेवलेल्या ठिकाणी तोडफोड करीत तलवारी, कोयते, चॉपर या धारदार शस्त्रासह लोखंडी सळ्या, मोठे हातोडे, दांडे असा शस्त्रसाठा शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनमाड रेल्वेस्थानकावरील व्यवसायाच्या वादातून सय्यद आणि मोमिन गटात वाद झाला होता.या हल्ल्यात पापा शेख याचा मृत्यु झाला. या घटनेनंतर शुक्रवारी पुन्हा संतप्त जमावाने हल्लेखोरांनी शस्त्र लपवून ठेवलेल्या तीन दुकान, पत्र्याचे शेड, तीन ते चार घरांची तोडफोड करीत हल्ल्यासाठी लपवून ठेवलेल्या तलवारी, कोयते, चॉपर या धारदार शस्त्रासह लोखंडी सळ्या, मोठे हातोडे, दांडे शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले . आजच्या घटनेने पुन्हा शहरात तणावाचे वातावरण पसरले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .या शसस्त्र हल्ल्यातील मुख्य असलेले आरोपी अटक केलेले नाही .सय्यद परीवारातील मुख्य आरोपी अटक करावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज मोमीन गटाने मनमाड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला . अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी जमावची समजूत काढून लवकरात लवकर मुख्य आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.