पंचवटीतील मोरे मळा चौफुलीवर रास्ता रोकोने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:05 PM2018-10-03T16:05:20+5:302018-10-03T16:07:50+5:30
मोरे मळा चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यात आतापर्यंत काही जणांचे हकनाक बळी गेले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या भागातील वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी चौफुलीवर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी
नाशिक : हनुमानवाडी-मोरे मळा चौफुली रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी दहा वाजता परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांनी रस्त्यावर धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की केल्याने काही काळ तणावही निर्माण झाला. अखेर आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोरे मळा चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यात आतापर्यंत काही जणांचे हकनाक बळी गेले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या भागातील वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी चौफुलीवर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच परिसरात गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा केली होती. अशातच मंगळवारी रात्री सुमारास दोघा दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने नागरिकांनी रात्रीच या ठिकाणी गर्दी केली होती. वाहतूक अव्यवस्थेच्या कारणामुळे अपघात घडल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानकपणे रस्त्यावर उतरून प्रशासनाने गतिरोधक बसविले नसल्याचे कारण पुढे करत रास्ता रोको केला. रास्ता रोको केल्याने बराच वेळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. या रास्ता रोकोबाबत पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांना सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी व गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करून तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. त्यावर पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना त्याचवेळी काही संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलीस कर्मचारी व अधिका-यांशी अरेरावी करून हुज्जत घातली. यावेळी पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी हुज्जत घालणा-या दोन-तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मोरे मळा चौफुलीवर रास्ता रोको झाल्याचे समजतात वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमणूक करणार असल्याचे सांगून प्रशासनाकडे सिग्नल व गतिरोधक बसण्याबाबत पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी रास्ता रोको मागे घेतला. सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.