युवकाच्या मृत्यूनंतर तणाव

By admin | Published: September 30, 2016 11:19 PM2016-09-30T23:19:56+5:302016-09-30T23:20:29+5:30

टाके घोटी : शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

Tensions after the death of a young man | युवकाच्या मृत्यूनंतर तणाव

युवकाच्या मृत्यूनंतर तणाव

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी शिवारात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बुधवारी संध्याकाळी शाळेचा फलक लावण्यासाठी सुमारे साठ फूट उंचावर गेलेल्या युवकाचा सिमेंटचा पत्रा फुटल्याने उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळा प्रशासनाने मृत युवकाच्या नातलगांना न कळवता जबाबदारी झटकल्याने संतप्त झालेल्या नातलगांनी आणि घोटी ग्रामस्थांनी आज सकाळी या युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात आणून ठेवला. जोपर्यंत शाळा प्रशासन जबाबदारी स्वीकारत नाही व योग्य तोडगा काढीत नाही तोपर्यंत शाळेच्या आवारातून मृतदेह हालविणार नाही व अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका शाळेच्या आवारात जमलेल्या शेकडो जणांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घोटी येथील रवींद्र वासुदेव रसाळ (३०) याचा पेंटर व बॅनर तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्याला टाके घोटी येथील पंचवटी इंग्लिश स्कूलमध्ये फलक तयार करण्याचे काम मिळाले होते. बुधवारी संध्याकाळी रवींद्र तयार झालेला फलक घेऊन शाळेत गेला असता त्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने फलक शाळेच्या इमारतीवर लावण्याची बळजबरी केली. इच्छा नसतानाही रवींद्र साठ फूट उंचीच्या छतावर चढला; मात्र सिमेंटचा पत्रा अचानक तुटल्याने या पत्र्यासह रवींद्र साठ फूट जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या बाबीकडे दुर्लक्ष करीत जबाबदारी झटकत नातलगांना न कळविता मृतदेह परस्पर रुग्णालयात हलविला. दरम्यान, सदरचा प्रकार आज सकाळी नातलगांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतली. (वार्ताहर)
शाळा व्यवस्थापनाचे कोणीही उपस्थित नसल्याने त्या युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सकाळी ११ वाजता सदर युवकाचा मृतदेह शाळेच्या आवारात आणून ठेवण्यात आला. जोपर्यंत या युवकाच्या मृत्यूची जबाबदारी शाळा प्रशासन घेत नाही. या युवकाच्या मृत्यूस शाळा प्रशासन जबाबदार असल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
४शाळा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या सूचनेवरून नीलकंठ सोनवणे, रामदास गांगुर्डे आदिंचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मध्यस्थी करीत मृत युवकाच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्याचे शाळा व्यवस्थापनाने जाहीर केल्यानंतर हा मृतदेह तब्बल दोन तासांनंतर अंतिम विधीसाठी हलविण्यात आला.

Web Title: Tensions after the death of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.