अधिकार्यांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:01+5:302021-02-25T04:18:01+5:30
पिंपळखुटे व भुलेगाव येथील शेतकर्यांनी मंगळवारपासून (दि. २३) येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. ...
पिंपळखुटे व भुलेगाव येथील शेतकर्यांनी मंगळवारपासून (दि. २३) येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. तर पाणी सोडू नये या मागणीसाठी डोंगरगाव, तळवाडे, पिंपळखुटे खुर्द व पिंपळखुटे बुद्रुक, भारम, कोळम, भुलेगाव आदी गावांतील शेतकर्यांनी डोंगरगाव धरणावर ठिय्या देत बुधवारपासून (दि. २४) आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
पाणी सोडण्याची मागणी करणार्या उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार दोनदा पाणी सोडण्याचा प्रयत्न अधिकार्यांनी केला, तर पाणी सोडू नका यासाठी शेकडो शेतकर्यांचा विरोध झाल्याने पाणी न सोडता अधिकार्यांना परतावे लागले होते. पाण्यावरून निर्माण झालेल्या या परस्पर विरोधी मागण्यांमुळे डोंगरगाव परिसरातील गावांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तर स्थानिक पाटबंधारे विभागाचे अधिकारी पेचात सापडले होते.
दरम्यान, बुधवारी, (दि. २४) पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पाटील, सहायक अभियंता श्रीमती सरोदे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूच्या शेतकर्यांची बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित दोन्ही गटांना लेखी पत्र देण्यात आले. सदर पत्रावर दोन्ही गटांनी समाधान व्यक्त करत उपोषण आंदोलन स्थगित केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने भारम सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय सोमासे यांनी अधिकार्यांचे आभार मानले. उपस्थित शेतकर्यांनीही अधिकार्यांच्या योग्य भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दत्तात्रय सोमासे, बाळासाहेब आरखडे, रामनाथ आरखडे, सुरेश कुर्हे, ज्ञानेश्वर सोमवंशी, संतोष राऊत, साईनाथ ढोकळे, रमेश ढोकळे, गौतम पगारे, साईनाथ मोहन, मारुती सोमासे, जालिंदर सोमवंशी, खलील पटेल, शकील पटेल, कचरू मोहन, दत्तू रोठे, माधव उंडे, पोपट मोहन, भाऊसाहेब सोमवंशी, साहेबराव सोमवंशी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्फो
काय म्हटले आहे पत्रात?
डोंगरगाव तलावाची पार्श्वभूमी पाहता मागील वीस वर्षांपासून सदर चारीने सिंचनाचे आवर्तन देण्यात आलेले नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत चारीची दुरवस्था झालेली आहे. चारीचे बांधकाम नादुरुस्त झाले आहे. चारी बुजली आहे. त्यामुळे चारीने पाणी जाण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज नमुना नंबर ७ नामंजूर करण्यात येत आहे. चारीचे काम सुरळीत झाल्यानंतर उपलब्ध पाणी साठ्यानुसार नियोजन करणे शक्य असल्याने उपोषण मागे घेण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे.
फोटो- २४ डोंगरगाव वॉटर
डोंगरगाव पाणीप्रश्नी दोन्ही गटांची झालेली बैठक.
===Photopath===
240221\24nsk_33_24022021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ डोंगरगाव वॉटर डोंगरगाव पाणीप्रश्नी दोन्ही गटांची झालेली बैठक.