सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:24+5:302021-06-02T04:12:24+5:30

नाशिक : दहावीच्या निकालासाठी जाहीर झालेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने कोरोनाकाळात शैक्षणिक क्षेत्राची रूतलेले चक्रे ...

Tenth result of all schools is one hundred percent | सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

Next

नाशिक : दहावीच्या निकालासाठी जाहीर झालेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने कोरोनाकाळात शैक्षणिक क्षेत्राची रूतलेले चक्रे पुन्हा फिरू लागली आहे. या मूल्यांकन पद्धतीमुळे दहावीचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असले तरी निकाल विद्यार्थ्यांच्या नववीतील गुणवत्तेच्या व दहावीतील अभ्यासाच्या आधारे तयार होणार आहे. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्तेनुसारच असणार असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

दहावीच्या निकालाच्या मूल्यांकनासोबतच अकरावीचे प्रवेश विद्यार्थी व पालकांनासह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून, दहावीच्या निकालासाठी निश्चित करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यामापनाच्या सूत्राचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत आहे. कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कशा पद्धतीने जाहीर होणार, याकडे लाखो विद्यार्थी व पालकांसह शिक्षक आणि संस्थाचालकांचेही लक्ष लागले होते. मात्र, शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यांकनाचे सूत्र स्पष्ट केल्यानंतर त्या आधारे दहावीचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असलेे तरी हा निकाल वास्तविक गुणवत्तेच्या आधारेच निकाल तयार होणार असल्याची प्रतिक्रिया पालकांनसोबतच विद्यार्थ्यांमध्येही उमटत आहे.

------

विद्यार्थ्यांचे दडपण कमी होणार

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्यकच होते. त्यांना भविष्यात या गुणपत्रिकांची गरज भासणारच आहे. त्यामुळे अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून त्यांचे निकाल तयार केले जाणार असल्याने ते विद्यार्थ्यांच्या गुण‌वत्तेनुसारच असणार आहेत.

- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी

कोट-

कोरोनाचे संकट लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक दडपण कमी करणारा चांगला निर्णय घेतला आहे. शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. शाळांनी , शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मूल्यमापन करणे आवश्यक आहे.

- गुलाबराव भामरे, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल

कोट-

शासनाने नववीच्या ५० टक्के गुणांचा विचार करून दहावीचा निकाल तयार करण्याचा विचार केल्याने ही बाब विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व वास्तववादी आहे. त्यामुळे दहावीच्या निकालासंदर्भात शासननिर्णयाचे माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने स्वागत आहे.

- मोहन चकोर, अध्यक्ष, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ

---

इन्फो -

शंभर गुणांच्या मूल्यमापनाचे सूत्र असे

-नववीच्या विषयनिहाय अंतिम निकालातील ५० टक्के गुण

-दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० टक्के गुण

- दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २० टक्के गुण

---

विद्यार्थी खूश

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थी निश्चिंत झाले. त्यांचा अभ्यासाचा सराव तुटला व परीक्षा देण्याची मानसिकताही संपुष्टात आली होती. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यामुळे पुन्हा परीक्षा होणार की काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, सरकारने मूल्यांकनाचे सूत्र जाहीर करून या परीक्षा होणारच नसल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थीही खूश झाले आहे.

--

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी

मुले - ५२,८०३

मुली -४६,१४६

एकूण- ९८,९५९

---------

पुढील प्रवेशाचे काय

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेण्यात येणार आहे. या सीईटीच्या गुणवत्तेच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर रिक्त जागांवर सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

--

पालक म्हणतात- विद्यार्थ्यांची सुरक्षितताच महत्त्वाची

सरकारने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा घेतलेलेला निर्णय योग्यच होता. आता निकालासाठी अंतर्गत मूल्यांकनाची पद्धत वापरून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारेच निकाल मिळणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षितताच महत्त्वाची होती

- राजेश जाधव, पालक

----

दहावीचे विद्यार्थी सीईटीईतून त्यांची प्रवेशाची क्षमता सिद्ध करतीलच. त्यामुळे सरकराने कोरोनाकाळात परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपली हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसारच निकाल मिळणार असल्याने संकटकाळात सरकारने मूल्यांकन पद्धतीचा सुवर्णमध्ये साधला आहे.

- रवींद्र पवार, पालक

Web Title: Tenth result of all schools is one hundred percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.