आजपासून दहावीची परीक्षा
By admin | Published: February 29, 2016 10:52 PM2016-02-29T22:52:57+5:302016-02-29T22:53:32+5:30
आज भाषा विषयाचा पेपर; सकाळी ११ वाजता परीक्षा
नाशिक : आज दि. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून, या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ९४,१६९ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ८ हजार ६४० इतकी आहे. विभागात सर्वांत कमी विद्यार्थी संख्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक, कॅमेरा पथक आणि बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर पूर्णवेळ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
पहिल्याच दिवशी भाषा या विषयाचा पेपर असून, परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विभागीय सचिव मारवाडी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९४ हजार १६९ इतकी असून, धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या ३० हजार १७१, जळगाव जिल्ह्यातून ६३,५७९, तर नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या सर्वात कमी २० हजार ७२१ इतकी आहे. विभागातील एकूण विद्यार्थी संख्या २ लाख ८ हजार ६४० इतकी आहे.
विभागातील २,६१८ शाळांमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. विभागातील परीक्षा केंद्रांची संख्या ४१३ इतकी आहे, तर जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देतील. विभागात ५८ परीक्षकांची नेमणूक माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात तसेच विभागात कुठेही कॉपीचा गैरप्रकार घडू नये, यासाठी भरारी पथकांची नजर परीक्षा केंद्रांवर असणार आहे.
यंदा विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्र नमूद असल्याने विद्यार्थ्यांना केंद्र शोधण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा विभागीय मंडळाने केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दहा मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार असून, याबाबतची माहिती त्यांना शाळास्तरावरच देण्यात आली आहे. बारावी परीक्षेचा अनुभव लक्षात घेता विभागात चारही जिल्ह्यांमध्ये परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, भरारी पथकाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)