आजपासून दहावीची परीक्षा
By admin | Published: March 7, 2017 01:23 AM2017-03-07T01:23:24+5:302017-03-07T01:23:47+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून (दि.७) सुरू होत आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून (दि.७) सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार ७३० विद्यार्थ्यांसह विभागातील एकूण दोन लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी ४१७ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी शिक्षण मंडळाची २८ भरारी पथके परीक्षेवर नजर ठेवणार आहे.
दहावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण ९६ हजार ७३० विद्यार्थ्यांसाठी १८८ परीक्षा केंद्र असून, धुळे जिल्ह्णातील २९ हजार ९५० विद्यार्थ्यांना ६३ परीक्षा केंद्रांमध्ये पेपर द्यावे लागतील. जळगावमधून ६४ हजार ४८७ विद्यार्थ्यांसाठी १२७ परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. तर नंदुरबारमध्ये ४० परीक्षा केंद्रांवर २१ हजार ४०९ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. याप्रमाणे एकूण २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी मराठी भाषेचा पहिला पेपर देणार आहेत. या चारही जिल्ह्णांमध्ये परीक्षेवर नजर ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाने एकूण २८ भरारी पथके नेमली आहेत. यातील नऊ भरारी पथके नाशिक जिल्ह्णातील विविध परीक्षा केंद्रांवर नजर ठेवून असतील. धुळे येथे ६, जळगावमध्ये ५, नंदुरबारमध्ये ४, विभागीय स्तरावर ४ अशी भरारी पथकांची नेमणूक आहे. तर संपूर्ण विभागात ५८ परीक्षक असणार आहेत.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून, परीक्षा केंद्राच्या आवारात दर्शनी भागात विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक पाहता येणार आहे.
काही विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळीच त्यांचा आसन क्रमांक आणि वर्ग क्रमांक पाहून खात्री करून घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आसन क्रमांक पाहता आला नाही त्यांनी परीक्षा केंद्रावर काही वेळ अगोदर पोहचून त्यांचा आसन क्रमांक निश्चित करून घेणे आवश्यक
आहे. (प्रतिनिधी)