दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:17 AM2021-01-19T04:17:15+5:302021-01-19T04:17:15+5:30
नाशिक : कोरोनामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यात या परीक्षा होण्याचे संकेत आहेत. ...
नाशिक : कोरोनामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यात या परीक्षा होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तीन महिन्यांवर परीक्षा आल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, यावर्षी कोरोनामुळे दहावी व बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. मात्र, यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेले नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. तर या वर्गांतील उपस्थिती वाढण्यासाठी पंधरवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे नऊ ते दहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन ते चार महिन्यात कसा पूर्ण होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.
दहावीचा अभ्यासक्रम
यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले, तरी गणित, विज्ञान यासारखे विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे अवघड आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.
बारावीचा अभ्यासक्रम
बारावीच्या अभ्यासक्रमातही यावर्षी कोरोनामुळे २५ टक्के कपात करण्यात आली आहे. बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्यक्ष वर्गात शिकवून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. एवढ्या कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनाही पडला आहे.
कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले . परंतु, गणित, विज्ञान व इंग्रजीसारखे विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवल्यानंतर चांगले लक्षात राहतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षच प्रभावित झाले असून, उर्वरित दोन महिन्यात अभ्यासक्रम शिकताना समजून घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
- सिद्धार्थ पगार, विद्यार्थी
आता तीन ते चार महिन्यात परीक्षा सुरू होतील. दरवर्षी जानेवारीत उजळणी अभ्यासाला सुरूवात होते. मात्र, यावर्षी अजूनही मूळ अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे आता जलदगतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार आहे.
- मनिषा जाधव, विद्यार्थिनी
काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नव्हते. तर शाळा सुरू झाल्यानंतरही काही विद्यार्थी उशिराने शाळेत येत आहेत. अशा विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार आहे. अशा स्थितीत परीक्षा लांबल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
-किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोरही अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. गणित व विज्ञानबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. हे विषय विद्यार्थ्यांना वर्गातच समजून घ्यावे लागणार आहेत. ऑनलाईनद्वारे कमी प्रमाणात अभ्यासक्रम शिकवला गेल्याने अभ्यासक्रम पूर्ण करतानाही कसरत करावी लागणार आहे, मात्र, अभ्यासक्रमात काही प्रमाणात कपात केल्याने दिलासा मिळाला आहे.
- पुरुषोत्तम रकिबे, राज्याध्यक्ष, शिक्षक विकास संघटना