दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:10+5:302021-02-18T04:25:10+5:30
नाशिक : दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणारी दहावी, बारावीची परीक्षा यंदा एप्रिल महिन्यात होणार आहे. या संदर्भातील संभाव्य वेळापत्रक ...
नाशिक : दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणारी दहावी, बारावीची परीक्षा यंदा एप्रिल महिन्यात होणार आहे. या संदर्भातील संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा २३, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.
कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. दरवर्षी या परीक्षा फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जातात.
दहावी-बारावीचे वर्ग सुरू झाले असून, त्यांना परीक्षेसाठीचा वेळ, तसेच त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा यासाठी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक हे स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, महाविद्यालयांना पाठविले जाणार आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असले तरी या संदर्भातील कुणाच्या काही हरकती असतील तर त्यांना येत्या २२ तारखेपर्यंत लेखी स्वरुपात विभागीय मंडळांकडे कळविता येणार आहे.
--इन्फो--
व्हायरल वेळापत्रकापासून ग्राह्य नाही
मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रक देण्यात आलेले आहे. मात्र, ही सुविधा ही फक्त माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हेच अंतिम असेल असे राज्य मंडळाने कळविले आहे. या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थांनी परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणांनी छापाई केलेले, व्हॉटसॲपवर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य परीक्षा मंडळाकडून करण्यात आलेले आहे.