राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांचा कार्यकाळ संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 02:04 PM2020-07-20T14:04:42+5:302020-07-20T14:22:40+5:30
एकूण ३५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली गेली होती. या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता मागील २९ जूनला पुर्ण झाला आहे.
नाशिक : पर्यावरण, निसर्ग, वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी वनविभाग व सर्वसामान्य जनता यांच्यात जनजागृतीची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ नुकताच पुर्ण झाला आहे. यामुळे आता पुढील तीन वर्षांकरिता नव्याने नियुक्तीची प्रक्रिया लवकरच वनविभागाकडून राबविली जाण्याची चिन्हे आहेत.
निसर्गाविषयीची आवड आणि जिज्ञासेपोटी निसर्गातील पशु, पक्ष्यांसह पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या कृतिशिल अभ्यासक लोकांमधून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम-४नुसार मानद वन्यजीव रक्षकांंची नियुक्ती शासनाच्या महसूल व वनविभागाकडून तीन वर्षांकरिता केली जाते. २९ जुन २०१७ साली शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीचा शासननिर्णय जाहीर केला होता. या शासननिर्णयाचा कालावधी गेल्या जून महिन्यात पुर्ण झाला. जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा आवाका तसेच जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीवसंपदा आदि बाबी लक्षात घेता कोठे चार तर कोठे तीन, दोन आणि एक याप्रमाणे मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली जाते. नागपूरसाठी मागील शासननिर्णयानुसार चार तर चंद्रपूर, अमरावतीसाठी तीन गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन तर मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यासह उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक असे एकूण ३५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली गेली होती. या सर्व मानद वन्यजीव रक्षकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता मागील २९ जूनला पुर्ण झाला आहे.
जनप्रबोधनासाठी महत्त्वाची भूमिका
मानव-वन्यप्राणी संघर्ष असो किंवा पर्यावरण संरक्षण, वन व वन्यजीव संवर्धन असो यासाठी जनप्रबोधन करण्याकरिता वनविभाग व सर्वसामान्य लोकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते.