मुदत संपली आता गोठेधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:34 PM2019-02-26T23:34:20+5:302019-02-27T00:30:41+5:30
शहरातील ज्या गोठेधारकांची मुदत संपली त्यांच्यावर आता तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्रशासनाचे स्वच्छ शहर सर्वेक्षण संपताच त्या अनुषंघानेदेखील मुकादमांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
नाशिक : शहरातील ज्या गोठेधारकांची मुदत संपली त्यांच्यावर आता तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्रशासनाचे स्वच्छ शहर सर्वेक्षण संपताच त्या अनुषंघानेदेखील मुकादमांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून गोठे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या तक्रारी करीत असतात. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने गोठे हटविण्यासाठी यापूर्वीच डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली होती तर गोठेधारकांनी आम्हाला जागा द्या, मग शहराबाहेर जातो अशी भूमिका घेतली होती. परंतु त्यावर पुढे काहीच झाले नाही. दरम्यान, ज्या गोठेधारकांना हटविण्याची मुदत संपली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे शहरात अनेक भागांत अस्वच्छतेच्या तक्रारी वाढत आहेत. त्याबाबत आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्यानुसार कर्तव्यात कुचराई करणारे मुकादम अथवा सफाई कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, महापालिकेतील गाजलेला २१ कोटी रुपयांचे भूखंड मोबदला प्रकरण तसेच घंटागाडीचा ठेका तसेच कामगारनगर येथील स्वागत हाइट प्रकरणी खातेप्रमुखांना त्याबाबत आढावा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या तिन्ही विषयांवर स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत यापूर्वीच वादळी चर्चा झाली आहे. सदरच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाला चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतु त्यावर कारवाई झालेली नाही.
गोठे स्थलांतर रखडले
महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर त्यावेळेपासून म्हणजे सुमारे २५-३० वर्षांपासून शहरातील गोठे अन्यत्र हलविण्याची चर्चा होत आहे. मात्र राजकीय नेत्यांचेच मोठ्याप्रमाणात गोठे असलेले अद्यापही ते शक्य झालेले नाहीत.