बिल्डर्सच्या कार्यालयाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:50+5:302021-04-01T04:15:50+5:30

नाशिक : द्वारका येथील खरबंदा पार्कशेजारी असलेल्या जानकी प्लाझा या व्यावसायिक संकुलात असलेल्या सुनील खोडे बिल्डर्स व डेव्हलपर्स या ...

Terrible fire at builders' office | बिल्डर्सच्या कार्यालयाला भीषण आग

बिल्डर्सच्या कार्यालयाला भीषण आग

Next

नाशिक : द्वारका येथील खरबंदा पार्कशेजारी असलेल्या जानकी प्लाझा या व्यावसायिक संकुलात असलेल्या सुनील खोडे बिल्डर्स व डेव्हलपर्स या कार्यालयाला बुधवारी (दि. ३१) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन बंबासह घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने फर्निचरसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाले होते. या दुर्घटनेत सुमारे ७० लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जानकी प्लाझा या संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर सामाजिक कार्यकर्ते बांधकाम व्यावसायिक सुनील माधव खोडे यांचे मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिक कार्यालय आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानकपणे कार्यालयातून धूर बाहेर येऊ लागल्याने आजूबाजूंच्या लोकांच्या व व्यावसायिकांच्या लक्षात आल्याने एका जागरूक नागरिकाने त्वरित घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली.. साडेअकरा वाजेच्या सुमारास माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातून दोन बंबासह बंबचालक महेश कदम, गंगाराम निंबेकर, फायरमन तौसिफ शेख, दिनेश लासुरे, इसहाक शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत आगीचे स्वरूप वाढलेले होते. संपूर्ण कार्यालय आगीच्या वेढ्यात सापडल्याने तात्काळ संपूर्ण संकुल रिकामे करण्यात आले. तिसऱ्या मजल्यावरील सर्व व्यावसायिकांनी खाली धाव घेतली होती. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. आग तिसऱ्या मजल्यावर असल्याने काही प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. तासाभरात आग नियंत्रणात आली.

या दुर्घटनेत बांधकाम व्यावसायिकाच्या महत्त्वाच्या फाइल्ससह फर्निचर व अन्य वस्तू जळाल्या होत्या. दरम्यान, आग लागली तेव्हा कार्यालय बंद होते, यामुळे मोठा अनर्थ टळला व कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या कार्यालयाचे २००८ साली संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले होते. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

------

प्रतिक्रिया

माझे कार्यालय संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. संकुलाच्या टेरेसवर अनधिकृतपणे संबंधित संकुल उभारणी करणाऱ्या बिल्डरकडून गार्डन तयार करण्यात आले होते. यामुळे स्लॅबला हादरे बसून त्याद्वारे तडे जाऊन गार्डनचे पाणी मुरत होते. याबाबत वारंवार संबंधित बिल्डरच्या लक्षात आणून दिले; मात्र त्यांनी याकडे दुर्लक्षच केले. परिणामी आज माझे संपूर्ण कार्यालय जळून राख झाले. पाणी जर झिरपले नसते तर शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचे काहीच कारण नव्हते.

- सुनील खोडे, कार्यालय मालक

Web Title: Terrible fire at builders' office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.