बिबट्याचा वावर, रामनगरमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:47 AM2021-03-09T00:47:53+5:302021-03-09T00:50:37+5:30
रामनगर : रामनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
रामनगर : रामनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. प्रत्येक दिवशी अनेक शेतकऱ्यांना कधी उसाच्या फडात तर कधी नदीच्या काठावर, गावकुसाला, झाडांच्या आडोशाला बिबट्या नजरेस पडत असल्याने, या परिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रामनगर परिसरातील गणेश टेकडी, पिंपळगारस्ता, लिंबालवण याभागात बिबट्याचे दर्शन अनेक शेतकऱ्यांना झाले आहे. रविवारी (दि.७) गणेश टेकडी परिसरातील रामदास दगडू थेटे यांच्या गट नं. २०१ मधील उसाच्या शेतामध्ये बिबट्या व मादी दोन बछडे सुरेश थेटे व देविदास कोल्हे, ज्ञानेश्वर जामकर यांना सायकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दिसून आले.
परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारनियमनमुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने, शेतकऱ्यांना रात्री विद्युत पंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. अशा वेळी रात्री अपरात्री एकटा शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहे, तर अनेक शेतकरी बिबट्याच्या भीतीने पिकांना पाणी देत नाहीत, त्यामुळे पाणी असूनही पिके सुकू लागली आहे. त्यामुळे तत्काळ वनविभागाने बिबट्याला व मादीला जेरबंद करावे, अशी मागणी रामनगर परिसरातील शेतकरी व नागरिक करत आहेत.