दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क तोतया भरारी पथक जेलरोड अभिनव शाळा केंद्रावरील प्रकार : दक्ष पालकामुळे प्रकार उघडकीस; संशयितांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:19 AM2018-03-02T02:19:12+5:302018-03-02T02:19:12+5:30
नाशिकरोड : दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु चक्क तोतया भरारी पथकाने दहावीच्या परीक्षा केंद्राचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिकरोड : दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. परंतु चक्क तोतया भरारी पथकाने दहावीच्या परीक्षा केंद्राचा ताबा घेतल्याचा प्रकार नाशिकरोड येथील अभिनव शाळा केंद्रावर घडल्याने परीक्षा केंद्राच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आहे. एका चाणाक्ष पालकामुळे सदर प्रकार उघडकीस आला असला, तरी संशयित पसार झाल्याने संशयितांच्या उद्देशाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इयत्ता दहावीच्या पहिल्याच पेपरला तोतया भरारी पथक बनून आलेल्या दोघा भामट्यांमुळे संपूर्ण यंत्रणेची धावपळ उडाली असून, परीक्षा केंद्रेच असुरक्षित असल्याची बाब यामुळे समोर आली आहे. जेलरोड नारायणबापू चौकाजवळील अभिनव मराठी शाळेत गुरुवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. यामुळे परीक्षार्थी व पालकांची शाळेत सकाळपासून गर्दी होती. पेपर सुरू होण्यास तासाभराचा अवधी असताना ३०-३२ वयोगटातील दोन युवक शाळेत आले. त्यांनी मुख्याध्यापक ऊर्मिला भालके व केंद्र संचालक जयश्री ठाकरे यांची भेट घेऊन आपण बोर्डाच्या भरारी पथकाचे सदस्य असल्याचे सांगत बोर्डाची झेराक्स कागदपत्रे तसेच खोटे ओळखपत्र दाखवले. खात्रीसाठी काही शिक्षकांच्या ओळखीही सांगितल्या. कॉपीमुक्त अभियानासाठी काही शिक्षकांशीही बोलायचे असल्याची त्यांनी बतावणी केली. याच शाळेतील परीक्षा केंद्रावर दोन वर्षांपूर्वी हेच तोतया भरारी पथकाचे सदस्य बनून आले होते, अशी आठवण येथील शिक्षकांना यावेळी झाली. सदर तरुण हे भरारी पथकाचे सदस्य नसल्याचे उघडकीस आल्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची अनेकांना आठवण झाली. अनेकांनी त्यावेळी अधिकारी म्हणून आलेले हेच ते दोन्ही युवक असल्याचे ठामपणे सांगितले. दोन वर्षांपूर्वींचे तोतया हेच असतील तर मग त्यांचा याच केंद्रावर वारंवार येण्याचा उद्देश काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय मंडळाचे भरारी पथक असल्याचे सांगून शाळेत प्रवेश करणाºया तोतया इसमांनी विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली. मात्र त्यानंतर आपले बिंग फुटण्याचा संशय आल्याने त्यांनी आपली कारवाई आटोपती घेत मुख्याध्यापकांकडे शेरा पुस्तिका मागितली. या तोतयांनी शेरा पुस्तिकेत ‘कॉपीमुक्त केंद्र’ असा शेरा मारून चव्हाण आणि सय्यद अशा नावाने स्वाक्षरीही केली. शिवाय आपला भ्रमणध्वनी क्रमांकही लिहिला. याच भ्रमणध्वनी क्रमांकांवर नंतर मुख्याध्यापकांनी संपर्क साधला असता सदर क्रमांक संकेत चव्हाण असल्याचे उत्तर पलीकडून देण्यात आले. मात्र संशयितांनी भ्रमणध्वनी ‘स्वीच आॅफ’ केला.