धोकादायक इमारतींचे होणार संरचना परीक्षण
By admin | Published: June 18, 2016 10:54 PM2016-06-18T22:54:04+5:302016-06-19T00:39:39+5:30
२५० इमारतींना नोटिसा : बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र अनिवार्य
नाशिक : महापालिकेने शहरातील ३० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झालेल्या धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) करणे अनिवार्य केले असून, त्यासाठी सुमारे २५० इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित इमारतमालकांना नगररचना विभागाकडे संरचना अभियंत्यामार्फत बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.
महापालिकेमार्फत दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती-वाडे यांना नोटिसा बजावल्या जातात. परंतु, या नोटिसांना कुणीही इमारत मालक अथवा भाडेकरू गांभीर्याने घेत नाहीत. मनपाच्या विभागीय कार्यालयामार्फतही केवळ कागदोपत्री कारवाईचा खेळ मांडला जातो. प्रत्यक्षात कुठेही कारवाई होताना दिसून येत नाही. वास्तविक ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केल्यापासून ३० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झाला असेल अशा इमारती वास्तव्य करण्यायोग्य आहेत किंवा नाही हे संरचना अभियंत्यामार्फत प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने यापूर्वी सन २०१३ मध्ये धोकादायक इमारतींना संरचना परीक्षण करून घेण्याबाबत सूचित केले होते, परंतु त्याची परिणामकारकपणे अंमलबजावणी झालेली नव्हती. आता महापालिकेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण करण्याचे ठरविले असून, त्यासाठी शहरातील सुमारे २५० धोकादायक इमारती-वाडे यांना बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्रासाठी नोटिसा बजावल्या आहेत.