टेस्टिंग लॅब, ऑक्सिजन बेड्सची सुसज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:36+5:302021-03-23T04:15:36+5:30
महानगरात कोविड नमुन्यांच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्र लॅब उभारण्यात आल्याने कोविड तसेच भविष्यातील अन्य कोणत्याही व्हायरल आजारांच्या ...
महानगरात कोविड नमुन्यांच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच स्वतंत्र लॅब उभारण्यात आल्याने कोविड तसेच भविष्यातील अन्य कोणत्याही व्हायरल आजारांच्या तपासणीसाठी आता अन्यत्र कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता उरलेली नाही. या लॅबमध्ये सध्या दिवसाला ८०० नमुन्यांची तपासणी शक्य आहे. भविष्यात त्यातदेखील वाढ करता येणार आहे. त्याशिवाय दोन खासगी टेस्टिंग लॅबला देखील तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या निमित्ताने नाशिक आणि नाशिक रोडला प्रत्येकी एक याप्रमाणे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले असून मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयाने देखील स्वतंत्र ऑक्सिजन टँकची व्यवस्था करुन घेतली आहे. गत वर्षीच्या प्रारंभीच्या काळात जिल्ह्याला २८ ते ३० टन ऑक्सिजनची गरज असताना नाशिकमध्ये ८ ते १० टन ऑक्सिजनची निर्मिती तर २० टन बाहेरुन पुरवठा करण्यात आला. त्यानंतर मागणी वाढू लागल्यावर नाशिकला बाहेरुन दररोज ५० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ लागला. मात्र, ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन नाशिकमध्ये ऑक्सिजन उभारणीचे एकूण ९ प्लांट कार्यरत झाले असून १०० हून अधिक टन ऑक्सिजन उत्पादन होत असल्याने नाशिक शहर आणि जिल्हा ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाला आहे. त्याशिवाय जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची उभारणी देखील लवकर पूर्ण होणार असल्याने नाशिकला भविष्यात कधीही ऑक्सिजन तुटवडा होणार नाही. तसेच जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची संख्या २७२ वर पोहोचली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याशिवाय महानगरात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून तब्बल १२६१ ऑक्सिजन बेड्स आणि ५२४ आयसीयु बेड्स नागरिकांसाठी उपलब्ध झाले असल्याने आजारांच्या लाटेतही ही व्यवस्था काही प्रमाणात तरी पुरेशी पडणार आहे.
---------------
हा मजकूर कोरोना विशेष पानासाठी आहे.